नागपूर - ही तर 'श्री' ची इच्छा असे म्हणत राज्य सरकारने सोमवारपासून राज्यभरातील प्रार्थनास्थळे उघडण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने नागपुरातील सर्वच प्रमुख मंदिरे भक्तांसाठी खुले करण्याची तयारी सुरू झाली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून मंदिरे कुलूपबंद असल्याने भक्तांना मंदिरात प्रवेश नव्हता, मात्र आता राज्य सरकारने निर्णय घेतल्याने आता मंदिर परिसराची साफसफाई सुरू झाली आहे. तर मंदिर निर्जंतुक करण्याचे काम देखील सुरू झाले आहे.
दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात येत आहे. भक्तांना रांगेत दर्शन घेता यावे, यासाठी याचे देखील नियोजन केले जात आहे. नागपूरच्या साई मंदिरात सुद्धा मोठी गर्दी असते. त्या दृष्टीने मंदिरात व्यवस्था केली जात आहे.
मास्क नसेल तर भक्तांना मंदिरात प्रवेश नाही
मंदिर सुरू करण्याची परवानगी मिळाल्यानंतर नागपूरच्या प्रसिद्ध साई मंदिरात रोज हजारो भाविक येतील, अशी शक्यता आहे. राज्य सरकारच्या निर्णयानंतर आता सोमवारपासून भक्तांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. त्याकरिता साई मंदिरात दर्शनासाठी नियम बदलविण्यात आले आहे.
असे आहेत नियम -
- साई मंदिर परिसरात नेहमीसारखे समोरच्या प्रवेश दारातून प्रवेश मिळणार नसून मागील प्रवेश दारातून भाविकांना प्रवेश दिले जाणार आहे.
- प्रवेश करताना भविकांवर साबणाने हात-पाय स्वच्छ धुण्याची सक्ती राहील, त्यानंतर पुन्हा हात सॅनिटाइज करावे लागणार आहेत.
- मंदिर परिसरात इतर देवांच्या छोट्या मूर्तींचे दर्शन घेत भाविक मुख्य साई मंदिरात येतील.
- मुख्य मंदिरात ही साईबाबांच्या ओट्यापर्यंत जाऊन पादुकांना स्पर्श करता येणार नाही.
- ओट्याच्या 15 फूट अंतरावर बॅरिकेटच्या पलीकडून साई मूर्ती आणि पादुकांना नमस्कार करता येईल.
- शिवाय भाविकांनी आणलेले हार, नारळ, प्रसादाचे पाकीट, शाल थेट बाबांच्या ओट्यापर्यत जाणार नाही. त्या वस्तू ठराविक अंतरावर ठेवलेल्या टेबल्सवर अर्पण कराव्या लागणार आहे.
- एकाच वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी मंदिर ट्रस्ट ठराविक वेळेत ठराविक संख्येनेच भाविकांना प्रवेश देणार आहे.
या बदलांसह नागपूरकरांचे श्रद्धा स्थान असलेले साई मंदिर उद्यापासून भाविकांसाठी खुले केले जात आहे.
हेही वाचा - नागपूरपुत्र भूषण सतई यांना वीरमरण; नितीन राऊत यांनी व्यक्त केल्या संवेदना
हेही वाचा - पाकिस्तानचा भ्याड हल्ला: वीरमरण आलेल्या जवान भूषण यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यस्कार