नागपूर - राज्यात मार्चनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर शाळा महाविद्यालयाचे आणि परीक्षांचे वेळापत्रकच कोलमडले आहे. अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला नाही. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाकडून ९ नोव्हेंबरला होणाऱ्या बीएडच्या पथम सत्र परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यास झालेल्या विरोधानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
पुढील तारीख स्पष्ट नाही-
बीएड प्रथम सत्राची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार होती. मात्र, कोरोनाचा धोका न टळल्याने आणि विद्यार्थ्यांना त्याची बाधा होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, आता या परीक्षा पुन्हा नेमक्या कधी होतील या बाबत अद्यापही कोणतेही स्पष्टीकरण विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आले नाही.
द्वितीय वर्ष प्रवेशासाठी परीक्षा अनिवार्य-
बीएड प्रथम सत्राच्या परीक्षा या ९ नोव्हेंबर पासून आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र कोरोनामुळे या परीक्षे घेण्यास विद्यार्थ्यांमधून विरोध केला जात होता. शिवाय प्रथम सत्राच्या परीक्षा कोरोनापूर्वी सुरू झाल्या होत्या. याचा एक पेपरही झाला होता. मात्र पहिला पेपर होताच कोरोना आणि लॉकडाऊनमुळे उर्वरीत पेपर घेणे शक्य झाले नाही. सोबतच बीएड अभ्यासक्रमात थेट व्दितीय सत्रात प्रवेश देणे अशक्य आहे. त्याकरिता प्रथम सत्र परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांना आवश्यक आहे. त्यामुळे परीक्षा घेणे बंधनकारक आहे. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.