नागपूर - गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात पावसाने हजेरी लावली. मात्र, यामध्ये विदर्भात चक्क 47 टक्के पावसाचे प्रमाण घटल्याची नोंद प्रादेशिक हवामान विभागाने केली आहे. विदर्भात मृग नक्षत्रात पावसाने दडी मारल्यामुळे पाऊस उशिरा दाखल झाला. नागपूरमध्येही जून महिन्यात 52 टक्के पाऊस कमी झाला आहे.
विदर्भाला मान्सूनचा पहिला पावसासाठी जून महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडण्याची वाट बघावी लागली. येथे पावसाचे आगमन उशिरा झाल्याने पिण्याच्या पाण्याचे जलाशये अजूनही कोरडे आहेत. तलाव आणि धरणाचे पाण्याची पातळी अजूनही वर आली नाही. त्यामुळे विदर्भातील बळीराजा मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. विदर्भात जून महिन्यानंतर जुलै महिन्यात पावसाच्या सरी कोसळायला सुरवात झाली आहे.
जून महिन्यात विदर्भाच्या 11 जिल्ह्यात झालेल्या पावसाबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. जून महिन्यात पावसाचे आगमन लांबल्याने विदर्भात तब्बल 47 टक्के कमी पाऊस झाला आहे. तर नागपुरमध्ये 52 टक्के कमी पाऊस झाला आहे. जून महिन्यात कमी झालेल्या पावसाची कमतरता वरुणराजा जुलै महिन्यात भरून काढेल अशी शक्यता हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
जिल्हा कमी झालेल्या पावसाची टक्केवारी
नागपूर - 52%
वर्धा - 60℅
चंद्रपूर - 31℅
भंडारा - 69℅
गोंदिया - 67℅
गडचिरोली - 57℅
यवतमाळ - 55℅
अमरावती - 69℅
अकोला - 43℅
वाशीम - 45℅