नागपूर - रेल्वे पोलीस बल (आरपीएफ) नागपूरच्या स्पेशल क्राईम डिटेक्शन टीमला गीतांजली एक्सप्रेसमधील एका प्रवाशाकडे तब्बल ६७.५ लाख रुपये आढळून आले. आरपीएफ पोलिद्वारे या व्यक्तीची कसून चौकशी करण्यात आली. ही कारवाई दुपारी एक वाजेच्या सुमारास करण्यात आली. रामचंद्र मिश्रा(४८) असे त्या प्रवाशाचे नाव आहे.

रेल्वे पोलीस बल सध्या नागपूर रेल्वे स्थानकावर घडत असणाऱ्या गुन्ह्यांचा पर्दाफाश करत आहे. गीतांजली एक्सप्रेसमधील संशयीत प्रवाशाच्या चौकशी केल्यानंतर तो सोनार असल्याचे सांगितले. तसेच ही रक्कम तो नागपूरवरून चेन्नईला घेऊन जात असल्याचे त्याने चौकशी दरम्यान सांगितले.
संशयीत मिश्रा नागपूरातील इतवारी परिसरातील रहिवाशी असल्याचे समोर आले आहे. याच्याकडे असेलेल्या २ बॅगांमधील एकूण ६७.५ लाख रुपये रक्कम जप्त करण्यात आली आहे. ज्यात २ हजाराच्या नोटांचे ३० लाख तर ५०० च्या नोटांचे ३७.५ लाख रुपये आहेत.
पुढील कारवाईला आरपीएफने ही संपूर्ण रक्कम आयकर विभागाला सुपूर्द केली आहे. पुढील चौकशी आरपीएफ नागपूर पोलीस करत आहेत.