नागपूर - पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्त्वात मागील काही दिवसात भल्या-भल्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. यासोबतच कोरोनालाही रोखण्यात मदत झाली आहे. नागपूर पोलिसांनी मास्क, सुरक्षित अंतर, आहार, व्यायाम यासारख्या शस्त्रांच्यासह्याने कोरोनाला परतवून लावले आहे. उपराजधानी नागपुरची ओळख क्राईम कॅपिटल म्हणून आहे. त्याचप्रमाणत कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणूनही नागपुरला ओळख मिळाली आहे. गुन्हेगारांशी लढण्याबरोबरच पहिल्या लाटेतील अनुभवानंतर दुसऱ्या लाटेलाही रोखण्यात आले.
लसीकरण मोहिमेत सहभाग -
कोरोनाला रोखण्यात महत्वाचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण मोहीम आहे. जवळपास 95 ते 97 टक्के कर्मचाऱ्यांना लसीकरणाचा पाहिला डोस देण्यात आला आहे. यासोबत पहिल्या लाटेनंतर लक्षणे दिसताच काळजी घेत उपचार सुरू झाले. यासाठी प्रत्येक झोनला एक टीम कोरोना चाचणीची मोहीम राबवित होती. यासोबतच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वेळोवेळी गोळ्या औषध देण्यात आले. शिवाय रोज योगाभ्यास, योग्य आहार, पुरेशी विश्रांती हे शस्त्र कामी आले. यासोबत वेळोवेळी सावधानी म्हणून सुरक्षित अंतर, मास्क आणि हात स्वच्छ करणे या त्रिसूत्रीचा अवलंब करण्यात आला.
पहिल्या लाटेचा अनुभव -
जिल्ह्यात साधारण 8 हजार पोलीस कर्मचारी आहे. यात किमान 7 हजार कर्मचारी रोज कर्तव्यावर असतात. मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आणि मृत्यूदर वाढलेला होता. पण पोलीस दलातील परिस्थिती पाहता एप्रिल आणि मे या दोन महिन्यात ६५० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कोरोना बाधित झाले. पाहिल्या लाटेत ही संख्या 1 हजार 786 इतकी होती. तसेच पहिल्या लाटेत उपराजधानीत 18 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या लाटेत 4 जण दगावले. एप्रिल महिन्यात सर्वाधिक बधितांची नोंद झाली. एप्रिल आणि मे या दोन महिन्यात नागपुरात तब्ब्ल २ लाख ४३ हजार ८६९ नागरिक कोरोनाने बाधित झाल्याची नोंद आहे. तर ३ हजार ७१० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पण हॉटस्पॉटमध्ये काम करतानासुद्धा रेमडेसिवीरचा काळाबाजार आणि रस्त्यावर उतरून रिकामटेकड्यांना घरचा रस्ता दाखवण्याचे काम पोलीस दलातील कर्मचारी-अधिकाऱ्यांनी चोख बजावले.
कोरोनानंतर म्यूकरलाही करणार पराभूत
कोरोनानंतर आता म्यूकरमायकोसिसने पोलीस दलात संसर्ग झाला आहे. म्यूकरमायकोसिसला रोखण्यासाठी कोरोना बाधित पोलीस कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेतल्या जात आहेत. त्यांची तपासणी करून शरीरातील साखरेचे प्रमाण तपासले जात आहे. कोरोनाच्या दोन लाटा थोपवल्यानंतर आता म्यूकरमायकोसिस हा बूरशीजन्य आजार विळखा घालत आहे. शहरात या आजाराचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे आता कोरोनाप्रमाणेच म्यूकरलादेखील पराभूत करण्याचा निर्धार पोलिसांनी केला आहे.