नागपूर - सरकराने परवनागी दिली असली तरी नागपुरात अद्यापही दारूची दुकाने उघडली नाही. मात्र, दारूची मागणी प्रचंड वाढल्याने तस्कर छुप्या मार्गाने शहरात दारू विक्रीसाठी आणली जात आहे. शहरात शुक्रवारी एका विशिष्ट बनावटीच्या ट्रकमधून दारू आणताना पोलिसांनी ट्रकसह २४ लाखांची दारू जप्त केली. बेलतरोडी परिसरात ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांची नजर चुकवून शहरात दारू आणण्यासाठी तस्कर नवनवीन शक्कल लढवत आहेत. शहरातील बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या पथकाने वर्धा रोडवर दारू तस्करांचा ट्रक पकडला. मात्र, हा ट्रक रिकामा होता. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यामध्ये दारू आढळून आली. हा ट्रक बाहेरून रिकामा दिसत होता. मात्र, केबिनच्या मागे छुपे केबिन तयार केले होते. यामध्ये ७८ दारूची बॉक्स आढळून आले. प्रत्येकी एका बॉक्समध्ये ४८ याप्रमाणे ३ हजार ७४४ दारूच्या बाटल्या होत्या. मध्यप्रदेशातून या दारूची तस्करी महाराष्ट्रात सुरू होती. पोलिसांनी ट्रकसह एकूण २४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. धक्कदायक बाब म्हणजे ट्रकच्या समोरील काचेवर चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर मधील एका फॅक्टरीचा अत्यावश्यक सेवेचे परवानगी पत्र चिटकवलेले होते. त्यामुळे हे परवानगी पत्र खरे आहे की बनावट? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.