नागपूर - शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना देखील नागरिकांमध्ये भीती दिसून येत नाही. आज रविवारी ब्रेक द चेन अंतर्गत नागपूर पोलिसांनी व्हेहीकल रूट मार्च केला. या अंतर्गत पोलिसांच्या वाहनांच्या ताफ्याने शहराच्या वेगवेगळ्या भागातून मार्गक्रमण करत नागरिकांना कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. या रूट मार्च मध्ये शेकडो संख्येने पोलीस कर्मचारी आणि अधिकारी सहभागी झाले होते.
शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यातही गेल्या आठ दिवसात शहरात आणि जिल्ह्यात तब्बल पाचशेपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. अशा भीषण परिस्थितीत देखील नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे जराही पालन होत नसल्याने पोलिसांना व्हेहिकल रूट मार्च काढून जनजागृती करावी लागली आहे. या मार्चच्या माध्यमातून पोलिसांनी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे आणि गर्दी करू नये अशा प्रकारचे आवाहन केले.
नागरिकांना बेफिकिरी सोडण्याचे आवाहन ,
जिल्ह्यात रविवारी दिवसभरात ५ हजार ५१४ नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर तब्बल ७३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. नागरिकांनी स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त विनिता साहू यांनी केले आहे.