नागपूर - बेजबाबदारीने वागणारे आणि नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांना वाहतूक पोलिसांकडून दंड आकारला जात आहे. वाहतूक नियमांचे पालन न करणे, कारण नसताना घराबाहेर पडणे, दुचाकीवर परवानगी नसताना एकापेक्षा अधिक व्यक्ती बसणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे. या वरून नागपूर वाहतूक पोलिसांकडून कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे. आतापर्यंत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४ हजार ६०० पेक्षा अधिक लोकांवर कारवाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाकडून अनलॉकची नियमावली आखून देण्यात आली. मात्र, सामान्य नागरिकांकडून या नियमावलीचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले आहे. यावरूनच आता नागपूरात वाहतूक पोलिसांकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील विविध ठिकाणी ही कारवाई सुरू असल्याचे दिसून येत आहे. नागपूरकरांकडून होत असलेले नियमांचे उल्लंघन पाहता ही कारवाई केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच बेजबाबदारपणे बाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांकडून चांगलाच चोप दिला जात असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, १ जुलैपासून आतापर्यंत ४ हजार ६०० पेक्षा अधिक लोकांवर कारवाई केल्याचे वाहतूक पोलीस उपआयुक्त विक्रम साळी यांनी सांगितले. यात प्रामुख्याने दुचाकीवर एकापेक्षा अधिक व्यक्ती बसणे, गरज नसताना बाहेर फिरणे, मास्कचा वापर न करणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे अशांवर कारवाई सुरू असल्याचे उपआयुक्त साळी यांनी सांगितले. त्याचबरोबर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे यांच्यावर नियमित चलान कारवाई सुरू असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
विशेष बाब म्हणजे लॉकडाऊनच्या काळात २० मार्चपासून ते २० जूलैपर्यंत कारवाई करण्यात आली. यातून तब्बल ६ कोटी रुपयांचा महसूल पोलिसांनी जमा केल्याचे साळी यांनी सांगितले. सोबतच नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे देखील अत्यंत आवश्यक असल्याचे साळी यांनी सांगितले. त्यामुळे नागपूरकरांनी नियमांचे पालन करून प्रशासन व शासनाला सहकार्य करावे असेही आवाहन देखील यावेळी करण्यात आले.