नागपूर - जुगार आणि व्यसनासाठी दुचाकी चोरणाऱ्या एका चोरट्याला नागपूर शहरातील धंतोली पोलिसांनी मध्यप्रदेश राज्यातील शिवणी येथून अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 13 दुचाकी जप्त केल्या आहेत. संदीप टेंबरे, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा नागपूर शहराच्या विविध भागातून दुचाकी चोरल्यानंतर त्या आपल्या ओळखीच्या लोकांकडे गहाण ठेवायचा. त्यातून मिळालेल्या पैशातून जुगार खेळायचा आणि इतर व्यसन पूर्ण करायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अभ्यंकर मार्गावरील एका पॅथॉलॉजी लॅब समोर उभी असलेली दुचाकी चोरीला गेली होती. याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता त्यात आरोपी हा गाडी चोरताना दिसून आला. त्याआधारे पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास सुरू केला. आरोपी हा सावनेरमार्गे नागपूर आणि राज्याच्या बाहेर जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी एक पथक आरोपीच्या मागावर रवाना केले असताना आरोपी हा मध्यप्रदेश राज्यातील बम्होडा (ता. बरघट, जि. शिवनी) या गावात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपी संदीप टेंभरेला अटक केली.
चोरलेल्या गाड्या ठेवायचा गहाण
आरोपी संदीप टेंभरे हा नागपुरातील चोरलेली गाडी घेऊन थेट मध्यप्रदेशच्या आपल्या गावी निघून जायचा. काही दिवस गाडी जवळ ठेवल्यानंतर ती गाडी आपल्या मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तींकडे गहाण ठेऊन 20 ते 30 हजारांची रक्कम घेत असे. त्या पैशातून आरोपी हा जुगार आणि इतर शौक पूर्ण करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी सध्या नागपूर शहरातून चोरीला गेलेली 13 वाहने जप्त केली असून आणखी काही दुचाकी जप्त होण्याची शक्यता आहे. आरोपी संदीप हा एकटाच वाहन चोरी करायचा की आणखी कुणी त्याच्या सोबतीला आहे याबाबत पोलिसांनी तापस सुरू केला आहे.
हेही वाचा - नागपूरकर डेंग्यूने त्रस्त, महापौर मात्र रेडिओ जॉकी बनण्यात व्यस्त - काँग्रेस