नागपूर - आपल्या देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अजूनही पूर्णपणे संपलेला नाही. मात्र परिस्थितीसोबत दोन हात करण्याचे सामर्थ्य प्रत्येक भारतीयांमध्ये आहे. याचाच प्रत्यय आला तो म्हणजे प्रतिभासंपन्न राष्ट्रीय नेमबाज खेळाडू हर्षल झाडे याला भेटल्यानंतर. हर्षलने राष्ट्रीय स्तरावर अनेक नेमबाजीच्या स्पर्धा गाजवल्या आहेत. गेल्यावर्षीपर्यंत हर्षल नागपूर येथील एका क्रीडा संकुलात नेमबाजीचा सराव करत होता. यावेळी तो इतरांनाही प्रशिक्षण देण्याचे काम करायचा. ज्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. मात्र, लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत त्याच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे.
ज्या हातात रायफल, आता त्याच हातात चाकू-चमचे
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्व स्तरावरील स्पर्धा बंद झाल्या. त्यामुळे सरावसुद्धा बंद करावा लागला. ज्यामुळे मिळणारी मिळकतही बंद झाली आहे. सगळीकडे परिस्थिती बेताची असल्याने उत्पन्न मिळणे कठिण होऊन बसले आहे. त्यामुळे हर्षलने मित्रांच्या मदतीने मोमोज विक्रीचे दुकान सुरू केले आहे. त्यामुळे ज्या हातात नेम धरण्यासाठी शूटिंग रायफल (बंदूक) असायची, आता त्याच हातात चाकू आणि चमचे आले आहेत.
'देशासाठी लागेल तेवढ्या मेहनतीची तयारी'
'पुन्हा ते जुने दिवस येतील आणि माझ्या हातात रायफल येईल. तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये पदक मिळवून देशाची मान उंचावेन आणि स्वप्न पूर्ण करेन. त्यासाठी लागेल तेवढी मेहनत करायाल तयार आहे', असे हर्षलने म्हटले आहे.
कुटुंबासाठी १५ वर्षांची मेहनत पणाला
हर्षलने आपल्या नेमबाजीच्या कारकिर्दीत अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्तरांवरील स्पर्धांमध्ये भाग घेतला. त्याने तब्बल पाच वेळा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा गाजवल्या. अनेक पदकांचीही कमाई केली. मात्र, कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी त्याला १५ वर्षांची तपस्या आणि मेहनत बाजूला सारून केवळ कुटुंबाला जगवण्यासाठी मोमोज विकावे लागत आहेत. हर्षल झाडे कुटुंबातील मोठा मुलगा आहे. त्यात वडिल नसल्याने कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावरच आहे.
काय आहे हर्षलची मागणी?
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून बहुतांश क्रीडा स्पर्धा बंद पडलेल्या आहेत. त्याचबरोबर स्टेडियम देखील बंद आहेत. त्यामुळे सराव कुठे करायचा? हा प्रश्न खेळाडूंसमोर निर्माण झालेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने बंद झालेले स्टेडियम पुन्हा नव्याने सुरू करावे, सरावाची परवानगी द्यावी, अशी मागणी हर्षलसह अनेक खेळाडूंनी केली आहे.
गेल्या दीड वर्षांपूर्वी आपल्या देशात कोरोनाने शिरकाव केला आहे. ज्यानंतर लाखो लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. महिन्यामागे महिने निघून जात आहेत. मात्र परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी खराब होत आहे. त्यामुळे आता अनेकांच्या पदरी निराशा पडत आहे. त्यामुळे लोक हताश होत आहेत. कोरोनाच्या या दुष्टचक्रात आजही होतकरू तरुण वर्ग भरडला जात आहे. यामध्ये प्रतिभावंत खेळाडूसुद्धा प्रभावित झाले आहेत. त्यापैकीच एक आहे हर्षल झाडे.
हेही वाचा - अर्रर्र... पडली... मुंबईत मॅनहोलमध्ये पडली महिला, VIDEO झाला व्हायरल