नागपूर : महिला हत्या प्रकरणाचा गुंता वाढतच आहे. हत्येच्या २६ दिवसानंतरही महिलेचा मृतदेह मिळालेला नाही. त्यामुळे हत्येचं गूढ उलगडण्याऐवजी वाढतच आहे. महिलेचा मृतदेह किंवा मोबाईल फोन मिळत नसल्याने हतबल झालेल्या नागपूर पोलिसांनी आता जिल्हा सत्र न्यायालयात आरोपीची नार्को चाचणी करण्याची परवानगी मागण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्याची आज सुनावणी आहे. मुख्य आरोपी रोज माहिती बदलत आहे. त्यामुळे तपासात अडचणी येत आहेत. महिलेच्या कुटुंबियांनी आरोपीची नार्को टेस्टची मागणी केली आहे. पोलिसांनी नार्को टेस्टसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
महिलेच्या मोबाईलमध्ये माहिती : महिला हत्या प्रकरणात नागपूर पोलिसांना अद्यापही पाहिजे तसं यश मिळालेलं नसल्यानं, आता नागपूर पोलिसांनी तांत्रिक दृष्टीने तपास सुरू केलेला आहे. महिलेची हत्या होऊन आता जवळजवळ २६ दिवसांचा कालावधी लोटलेला आहे. महिलाचा मृतदेह आणि मोबाईल अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही. महिलेच्या मोबाईलमध्ये खूप काही दडलं असावं म्हणून आरोपींनी महिलेचा मोबाईल नष्ट केल्याचा दाट संशय नागपूर पोलिसांना आहे.
पोलीस गुगलची मदत घेणार : महिला हत्या प्रकरणात मोबाईल हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो. म्हणून नागपूर पोलिसांनी महिलेच्या मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्यासाठी गुगलकडे मदत मागितली आहे. महिलेच्या मोबाईलमध्ये अनेक रहस्ये दडलेली असू शकतात. अनेक चेहरे देखील पुढे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी महिलेच्या मोबाईल डेटावरच लक्ष केंद्रित केलं आहे. जर महिलेच्या मोबाईलचा डेटा हा गुगल ड्राईव्हवर स्टोअर असल्यास गुगलच्या मदतीने रिकव्हर केला जाऊ शकतो, म्हणून पोलिसांनी यासंदर्भात गुगलकडे मदत मागितली आहे.
आमदार संजय शर्मा यांना विचारले प्रश्न : महिला हत्या प्रकरणात नागपूर पोलिसांनी मध्यप्रदेशातील तेंदुखेडाचे काँग्रेस पक्षाचे आमदार संजय शर्मा यांची २४ ऑगस्ट रोजी सलग तीन तास चौकशी केली. चौकशीत पोलिसांनी महिला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आमदार संजय शर्मा यांच्यासमोर बसवून चौकशी करण्यात आली. महिलेची हत्या केल्यानंतर आरोपीनी संजय शर्मा यांच्यासोबत संपर्क केला होता. त्यानंतर संजय शर्मा यांनी आरोपींना मदत केल्याचा संशय नागपूर पोलिसांना आहे. यासंदर्भात आमदार संजय शर्मा यांना तपास अधिकाऱ्यांनी काही प्रश्न विचारले. तीन तासांच्या चौकशीनंतर संजय शर्मा यांनी माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं म्हंटल आहे.
आरोपी आमदाराकडे होता कामाला : महिला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी हा आमदार संजय शर्मा यांच्याकडे पंधरा वर्षांपूर्वी कामाला होता. काम सोडल्यानंतर तो माझ्या संपर्कात नसल्याची माहिती संजय शर्मा यांनी दिली आहे. महिलेच्या हत्येनंतर आरोपीसोबत भेट झाली, पण त्याने यासंदर्भात मला कोणतीही माहिती दिली नसल्याचे ते म्हणाले आहेत. दुसऱ्या आरोपीला मी ओळखतो तो ठेकेदार आहे. त्यांना ओळखत असल्याची कबुली आमदार संजय शर्मा यांनी दिली आहे. नागपूर पोलिसांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली आहेत.
हत्या प्रकरणाच्या तपासावर आई संतुष्ट : पोलीस उपायुक्त-२ कार्यालयात आमदार संजय शर्मा आणि आरोपींची चौकशी सुरू असताना महिलेची आई यादेखील त्या ठिकाणी पोहचल्या होत्या. महिला बेपत्ता होऊन आता २३ दिवस लोटले असतानाही पोलिसांना तिचा मृतदेह का सापडत नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. महिलेसंदर्भात हनी ट्रॅपचे जे आरोप करण्यात आले आहेत ते खोटे आल्याचं त्या म्हणाल्या आहेत. तिला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नागपूर पोलिसांकडून योग्य पध्दतीने तपास केला जातो आहे. परंतु आरोपी दिशाभूल करत असल्याचं ते म्हणाले आहेत. महिला हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
महिला हत्येचा तपास कोणत्या दिशेने : महिला हत्या प्रकरणाच्या तपासाला अद्याप पाहिजे तशी गती मिळालेली नाही. महिलेचा मृतदेह आणि मोबाईल अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे तपासला अद्याप दिशाचं मिळालेली नाही. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी मुख्य आरोपीसह पाच आरोपींना आधीच अटक केली आहे. नागपूर पोलिसांनी संशयितांची कसून चौकशीही सुरू केली आहे.
हेही वाचा -