नागपूर : नागपूरच्या बेलतरोडी पोलीस स्टेशन अंतर्गत ५६ वर्षीय बाबाराव नागपुरे राहतात. पहिली पत्नी सोडून गेल्यानंतर बाबाराव याने शैलजा सोबत संसार थाटला होता. मात्र, दुसरी पत्नी शैलजा शेती नावाने करून देण्याची मागणी करत असल्याने बाबाराव आणि शैलजामध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता. त्यामुळे दोघेही विभक्त राहत होते.
पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेतले : पहिली पत्नी काल बाबाराव यांच्या शिवणगाव पुनर्वसन येथील प्लॉटवर आली होती. थोड्यावेळाने त्याची दुसरी पत्नी शैलजा देखील प्लॉट वर आली. तिथे संपत्तीच्या वादावरून दोघात भांडण सुरू झाले. वाद वाढला व झटापटीत बाबाराव याने पत्नीच्या डोक्यावर दगडाने वार केला. ज्यात पत्नी शैलजाचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक काही नागरिकांनी हत्येच्या घटनेची माहिती बेलतरोडी पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेतले आहे. तसेच आरोपीची कसून चौकशी सुरू आहे.
१८ लाखांचा वाद,आणि हत्या : काही दिवसापूर्वी बाबाराव नागपुरे यांनी शेती विकली होती,त्यातून त्यांना १८ लाख रुपये प्राप्त झाले. १८ लाख रुपये शैलजा यांनी स्वतः जवळ ठेऊन बाबाराव नागपुरे यांना घराबाहेर काढले होते. हा राग मनात घरून बाबाराव नागपुरेची हत्या केली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दुसरेही काही कारण असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील तपास सुरू आहे.
एप्रिलमध्ये चार खुनांची नोंद : एप्रिल महिन्यात नागपुरात एकूण चार हत्येच्या घटनांची नोंद झाली आहे. यामधील कळमना, वाडी, बेलतरोडी आणि बर्डी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक खुनाच्या घटनेची नोंद झाली आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात ८ हत्येच्या घटना घडल्या होत्या तर फेब्रुवारी महिन्यात शहरात ५ खून झाले आहे. मार्च महिन्यात सुद्धा ४ खुनाच्या घटनेची नोंद आहे.