नागपूर- महानगरपालिकेचा २ हजार ५०० कोटींचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. कोरोनामुळे मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑनलाइन बजेट सादर करण्यात आले. स्थायी समिती सभापती पिंटू झलके यांनी २ हजार ५०० कोटींचा बजेट सादर केला. यात अनेक योजनांना कात्री लावण्यात आली आहे. तर, सर्व करांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
कोरोनामुळे आरोग्य विभागाला जास्त निधी देण्यात आला. नागपुरातील प्रत्येक झोनमध्ये फिरत्या दवाखान्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय इतर विभागासाठी २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. मात्र, कोरोना काळात मनपाचे उत्पन्न घटले, त्याचा परिणाम मनपाच्या आजच्या अर्थसंकल्पात दिसून आला.
महानगर पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने अर्थसंकल्प सादर होणार असल्याने प्रशासनासोबत नगरसेवकांना देखील याबाबत उत्सुकता होती. अर्थसंकल्पात महानगर पालिकेच्या १० झोनमध्ये अंत्योदय योजनेनुसार १० फिरते दवाखाने सुरू करण्याला मान्यता देण्यात अली आहे. वंदे मातरम गणिती उद्यानाची निर्मिती देखील केली जाणार आहे. त्याकरिता बजेटमध्ये तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच नागपूर महानगर पालिका स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती देखील केली जाणार आहे.
वार्षिक उत्पन्न वाढवण्यासाठी आणि महसूल तूट भरून काढण्यासाठी पाणी, मालमत्ता, मनोरंजन कर वाढण्यात आले आहे. शिवाय तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्थगिती दिलेल्या ३४७ कोटींच्या कामांना देखील मंजुरी देण्यात आली आहे.
हेही वाचा- ऑस्ट्रेलियन नागरिकाने नागपूरच्या तरुणीशी रचलं लग्न, बिंग फुटल्यानंतर ३५ लाखांचे दागिने केले लंपास