नागपूर- उपराजधानी नागपुरात कोरोनाची एन्ट्री होऊन आता चार महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आहे. नागपुरात पहिला कोविडचा रुग्ण ११ मार्च रोजी आढळून आला होता. मात्र, कोविड-१९ चे जागतिक संकट ओळखून शासन आणि प्रसासनाने त्याआधीच प्रभावी उपाययोजना करायला सुरुवात केली होती. ज्यामुळे नागपुरात कोरोनाचा प्रसार फारसा झाला नाही.
राज्याच्या इतर महानगरांच्या तुलनेत नागपूर शहरात कधीही कोरोनाचा उद्रेक झाला नाही. तरी देखील नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुगणालयात (मेडिकल) ६०० खाटांचा एक वॉर्ड कोविड रुग्णांसाठी तयार करण्यात आला आहे. त्यापैकी २०० खाटा आयसीयूसाठी राखीव आहेत. मेडिकलमध्ये कोविड रुग्णांसाठी ८३ व्हेंटिलेटर लावण्यात आले आहेत. सध्या मेडिकलमध्ये १२७ अॅक्टिव्ह रुग्ण भर्ती आहेत. ४७३ खाटा अजूनही शिल्लक आहेत. तर दुसरीकडे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (मेयो) सुद्धा ६०० खाटांची व्यवस्था आहे. त्यापैकी १६० खाटा आयसीयूसाठी आहेत. त्याठिकाणी ८२ व्हेंटिलेटर सज्ज आहेत. सध्या मेयो रुग्णालयात १२० अॅक्टिव्ह रुग्ण भर्ती आहेत.
एम्स आणि मिलिटरी हॉस्पिटलमध्येही कोविड रुग्णांवर उपचार केले जात आहेत. सध्या एम्समध्ये ४९ रुग्ण आणि मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ३६ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या दोन्ही रुग्णालयांमध्ये ७० टक्के खाटा अजूनही शिल्लक आहेत. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शासनाकडून काही खासगी रुग्णालयांमध्ये कोविडच्या रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
नागपुरातील नामांकित वॉकहार्ट या खासगी रुग्णालयात तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नागपुरात उपलब्ध असलेल्या खाटांच्या तुलनेत रुग्ण संख्या कमी असल्याने कुठेही गोंधळाची परिस्थिती नाही. याशिवाय कारागृहातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी कारागृहात कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. तिथे १५० रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर आमदार निवसात सुद्धा कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. तिथे लक्षणे नसलेल्या रुग्णांना उपचारासाठी पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
भविष्यातील धोका लक्षात घेता श्री राधा स्वामी सत्संग मंडळाच्या काटोल मार्गावरील आश्रमात १५ हजार रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. त्याठीकाणी ५ हजार खाटांची सोय करण्यात आली आहे. तर दुसरीकडे लता मंगेशकर रुग्णालयाला स्टँड बाय वर ठेवण्यात आले आहे. कोरोनाच्या बाबतीत नागपुरातील परिस्थिती एकदम नियंत्रणात असल्याने, कोणतेही खासगी रुग्णालय शासनाने आपल्या ताब्यात घेतलेली नाहीत.
नागपूरमध्ये मेयो, मेडिकल, एम्स, माफसू, निरी आणि लता मंगेशकर रुग्णालयातील प्रयोग शाळेत कोविड चाचणी केली जाते आहे. मेयोत २५०, मेडिकलमध्ये १५०, एम्समध्ये १३० आणि इतर प्रयोग शाळांमध्ये सुमारे १५० ते २०० चाचण्या होत आहेत. मात्र, त्या तुलनेत नागपुरात संशयित रुग्णांची संख्या कमी झालेली आहे. या व्यतिरिक्त दोन खासगी प्रयोग शाळेत सुद्धा कोरोना टेस्ट केली जात आहे. त्यासाठी २ हजार २०० ते २ हजार ४०० रुपये आकारले जात आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात कोविड चाचण्या घेण्याची व्यवस्था नागपुरात असल्याने वेटींग लिट्सची कोणतीही भानगडच उरलेली नसल्याची माहिती समोर आली आहे.