नागपूर - पहिल्या टप्प्यातील निवडणुकांमधील नागपूर लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले, अशी रंगतदार लढत होत आहे. गडकरी विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत आहे, तर नाना पटोले यांनी भाजपचा विकास हा दिखावा असल्याचा प्रचार केला आहे. त्यामुळे या निवडणुकीला वेगळाच रंग चढला आहे. कोण नागपूरचा खासदार होणार? हे आज मतदार ठरवणार आहेत.
एकेकाळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघात २०१४ साली नितीन गडकरी यांनी पहिल्यांदाच काँग्रेस पक्षाचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांना प्रचंड मताधिक्क्याने पराभूत केले होते. २०१४ ते २०१९ या ५ वर्षाच्या काळात नितीन गडकरी यांनी नागपुरात विकासाची कामे खेचून आणली आहे, तर नाना पटोलेंनी गडकरींच्या विकासाच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून विकासाचा मुद्दा खोडून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे.
नागपुरात जातीय समीकरणदेखील फार महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी याकडे विशेष लक्ष दिले आहे. तेली-कुणबी मतांची टक्केवारी सर्वाधिक आहे. या २ जातीच्या मतांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांनी केलेला दिसतोय. नागपुरात मुस्लिम आणि बहुजन मतांची टक्केवारी देखील मोठी आहे. त्यामुळे हे २ समाज देखील निर्णायक भूमिकेत आले आहेत. त्यामुळे जातीय समीकरण जो पक्ष साधेल त्या पक्षाच्या उमेदवाराला विजय मिळवण्यात फारशी अडचण येणार नाही, असे चित्र नागपुरात बघायला मिळत आहे.