नागपूर - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक शहरांमध्ये टाळेबंदीचा निर्णय घेतला जात आहे. मात्र हे निर्णय स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक यांना विश्वासात घेऊन होत नसल्यामुळे प्रशासनासोबतच सरकरावर रोष व्यक्त होत आहे. नागपूरमध्ये लॉकडाऊनचा निर्णय झाला आहे. पालकमंत्री नितीन राऊत यांनी घेतलेल्या या निर्णयाविरोधात राजकीय वातावरण तापले आहे. लोकप्रतिनिधींना विचारात न घेता होत असलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयाचा भाजपकडून निषेध करण्यात आला आहे. दुसरीकडे औरंगाबादेतही लॉकडाऊनचा निर्णय झाला तेव्हाही प्रशासनाने स्थानिक लोकप्रतिनिधींना विचारले नसल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले होते.
भाजप आमदार प्रवीण दटके यांनी नागपूरमधील लॉकडाऊनचा विरोध केला आहे. लॉकडाऊनचा निर्णय पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी जाहीर केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. आमदार दटके यांचा आरोप आहे, की हे फसवे लॉकडाऊन आहे. हातावर पोट असणाऱ्या लोकांची यामुळे मोठे कुचंबना होत आहे. छोटे उद्योग, धंदे असणाऱ्यांचेही नुकसान होत आहे. जनतेतून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता लॉकडाऊन करण्यात आल्याचे आमदार प्रवीण दटके यांनी म्हटले आहे.
महापौरांनाही विचारले नाही
शहरात संचारबंदी लागू करताना महापौर म्हणून मला माझं मत देखील पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विचारले नाही, असे महापौर दयाशंकर तिवारी यांनी म्हटले आहे. सलग ९ दिवस बाजारपेठा बंद राहणार असल्याने अनेक छोट्या व्यापाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. नागपूरमध्ये ज्यापद्धतीने लॉकडाऊन लावले आहे त्याचा निषेध करतो असे महापौरांनी म्हटले आहे.