नागपूर - होळीच्या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन, शिमगा, धुळवड, होळी पौर्णिमा, धूलिवंदन व रंगपंचमी अशी विविध नावे आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी होळी साजरी करताना वेगवेगळ्या प्रथा आहेत. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी वाईट गोष्टींना शिव्या देण्याची प्रथा आहे. नागपूरमधील महामार्ग पोलीस दलात डीवायएसपी पदावर कार्यरत असलेल्या संजय पांडे यांनी तर होळी सणाचे निमित्त साधून कोरोनाला शिव्यांची लाखोळीच वाहिली आहे. पांडे यांच्या वैदर्भीय गावराण भाषेतील कविता पोलीस दलात प्रसिद्ध आहेत.
कोरोनामुळे उत्साहावर फिरले पाणी -
गेल्या वर्षांपासून जगभरात कोरोना संसर्गामुळे भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. भारतात सुद्धा कोरोनाची दुसरी लाट आली आहे. विदर्भात तर कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून नागपूर कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहे. कोरोनाचे नाव ऐकताच लोकांच्या तळ पायाची आग मस्तकात जात आहे. त्यातच आता कोरोनामुळे होळी देखील साजरी करता येणार नसल्याने धुळवड प्रेमींच्या उत्साहाला ग्रहणच लागले आहे. पोलीस दलातील प्रसिद्ध कवी संजय पांडे यांनी याही वर्षी होळी, कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये नवऱ्यांची झालेली अवस्था अशा अनेक विषयांवर कविता केल्या आहेत.
अशी साजरी केली जाते होळी -
राज्यात होळीच्या दिवशी काही लाकडे मंत्रोच्चारात जाळतात. पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची रीत आहे. होळीनंतर 5 दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदन साजरे होते. याला' धुळवड' असेही म्हणतात. या दिवशी होळीची रक्षा अंगाला फासली जाते किंवा ओल्या मातीत लोळण घेतली जाते. एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते.
हेही वाचा - होळीच रंगीत चित्र, जाणून घ्या देशभरात कुठे, कशी साजरी केली जाते