नागपूर - बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने नागपूरसह विदर्भात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यासोबतच पुढील दोन दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे.
बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून नागपूरसह विदर्भात पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याची दाट शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या चार दिवसांपैकी सुरुवातीचे दोन दिवस अतिवृष्टी होणार असून त्यानंतर ते दोन दिवस चांगला पाऊस होणार असल्याचे भाकित देखील हवामान विभागाने व्यक्त केले आहे.
मंगळवारपासून विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ यासह सर्वच जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे, हवामान विभागाने प्रशासनाला सतर्कतेची सूचना दिलेली आहे. यामध्ये विदर्भातील काही जिल्ह्यात दोनशे मिमी पेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता असल्यानेच हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे.
जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात पावसाची पूर्ण कसर भरून निघेल असा अंदाज देखील हवामान विभागाने व्यक्त केला आहे.