नागपूर - प्रेम संबंधाला विरोध करणाऱ्या आजी आणि त्यांच्या नातवाचा निर्घृण खून केल्याची घटना काल नागपूरमध्ये घडली. या प्रकरणातील आरोपीने रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक प्रकार घडला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. आजी-नातवाच्या हत्याकांडातील आरोपी हा अल्पवयीन आहे.
पोलीस मागावर असल्याने केली आत्महत्या -
आरोपीने लक्ष्मीबाई धुर्वे आणि त्यांचा नातू यश यांचा काल (गुरुवार) खून केला होता. संध्याकाळी पोलिसांना आरोपी कोण आहे, या बाबतीत खात्री पटल्यानंतर त्याचा शोध सुरू झाला होता. पोलीस आपल्या मागावर असल्याचे समजताच आरोपीने धावत्या रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या संदर्भांत रेल्वे पोलिसांकडून सूचना मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्याच बरोबर गिट्टीखदान आणि गुन्हेशाखेचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले होते. मृताची ओळख पटल्यानंतर त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
आरोपीने केला होता दुहेरी खून -
नागपूर शहरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी आजी आणि नातवाच्या दुहेरी हत्याकांडाने खळबळजनक उडाली होती. लक्ष्मीबाई धुर्वे (६० वर्ष-आजी) आणि यश धुर्वे (१० वर्ष- नातू) अशी हत्या झालेल्या दोघांची नावे आहेत. प्रेम प्रकरणातून हे हत्याकांड घडल्याचा संशय पोलिसांना होता.
आजीच्या नातीसोबत आरोपीचे होते प्रेमसंबंध -
मृत लक्ष्मीबाई धुर्वे यांच्या नातीचे आरोपीसोबत प्रेम संबंध आहेत. या प्रेम प्रकरणाची कुणकुण घरच्यांना लागल्यानंतर त्याला विरोध सुरू झाला होता. त्यामुळे धुर्वे कुटुंबीयांनी त्यांच्या मुलीला मध्य प्रदेश राज्यात राहणाऱ्या नातेवाईकांकडे ठेवले होते. त्यामुळे आरोपी संतापला होता. या विषयावरून त्याने अनेक वेळा धुर्वे कुटुंबीयांना धमक्या देखील दिल्या असल्याची माहिती पुढे आली आहे. आरोपीने दिलेल्या धमक्यांना त्यांनी गांभीर्याने घेतले नाही. काल आरोपीने दुपारी लक्ष्मीबाई धुर्वे आणि त्यांचा नातू यश हे घरी एकटेच असताना बळजबरीने घरात प्रवेश केला आणि त्या दोघांचाही धारधार शस्त्राने वार करुन खून केला आहे.