नागपूर - कोरोनाच्या काळात ऑक्सिजननंतर सर्वाधिक गरज व्हेंटिलेटरची भासली. यावर नागपुरातील डॉक्टर आणि पुण्यातील इंजिनिअरच्या मदतीने व्हेंटिलेटर बनवण्यात आले आहे. या व्हेंटिलेटरमध्ये काही खास फीचर्स असून कमी किमतीतील या व्हेंटिलेटरला प्राणसेतू ("PranaSetO2") असे नाव देण्यात आले आहे. बाजारातील महागड्या व्हेंटिलेटरच्या तुलनेत काही युनिक फिचर असल्याचा दावा याला बनवणाऱ्या डॉक्टर आणि इंजिनियरच्या सतेज मेडिनोवा या चमूने केला आहे.
या व्हेंटिलेटरमध्ये काही खास फिचर आहे. हे व्हेंटिलेटर नॉन इन्व्हेसिव म्हणजे या व्हेंटिलेटरमध्ये श्वास नलिकेत ट्युब टाकण्याची गरज पडत नाही. तर याला मास्कच्या साहाय्याने किंवा नेजलच्या कॅनूलाच्या साहाय्याने ऑक्सिजनचा पुरवठा रुग्णांना दिला जातो. आणखी अवघ्या दीड मिनिटात रुग्णाला लावल्या जाऊ शकते, असे नियोजन आहे.
ऑक्सिजन फ्लोचे सेल्फ सेन्सरबेस मॉनिटरिंगची सोय -
चार प्रकारचे सेटिंगमध्ये हे वापरता येते. यात सर्वात महत्वाचे म्हणजे ऑक्सिजचा अन्य अतिरिक्त उपयोग किंवा वेस्टेज आहे तो थांबवण्यासाठी सेन्सरची मदत होणार आहे. यात रुग्णाचा मास्क निघाल्यास अलार्म वाजण्यासोबत या स्मार्ट फिचरमुळे ऑक्सिजन बंद होऊन जाणार आहे. बंद झालेला ऑक्सिनचा पुरवठा हा मास्क तोंडाला लावला तर पुन्हा सुरू होणार, असे स्मार्ट फिचर यात दिले आहे. तसेच ऑक्सिजनचा दाब मोजणे असो की अन्य काही महत्वाचे पॅरॅमिटर या सर्व बाबी या व्हेंटिलेटरमध्ये असल्याचा दावा करण्यात आला आहे.
यामध्ये असणारे मोड्स -
ऑक्सिजन थेरेपी (HFNC), सिप्याप (CPAP) आणि बायप्या (BiPAP) मोड आणि सोबत हुम्युडीफायर, असे तीन मोड यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. इतर व्हेंटिलेटरमध्ये हे तीन डिव्हाईस वेगवेगळ्या असतात. यामध्ये ते एकत्र करण्यात आल्याने त्याचा आकार हा लहान झाला आहे. यात एफएनसी (HFNC) मोडमध्ये ग्राफ असणारा हा एकमेव व्हेंटिलेटर असण्याचा दावा करण्यात आला आहे. यासोबतच तिसऱ्या लाटेचा अंदाज पाहता यात थेट लहान मुलांसाठी वेगळी सेटिंग न करता पिडीयाट्रीशियन मोड आहे.. यासोबत अॅडल्ट (adult) मोडसुद्धा या व्हेंटिलेटरमध्ये समाविष्ट आहे.
हेही वाचा - नागपूर : 'ड्राइव इन वैक्सीनशन'चा शुभारंभ; ४५ वर्षांवरील नागरिकांना मिळेल लाभ
चार्टसोबत पॅरॅमिटर्स मोबाईलवर पाहून होऊ शकेल मॉनिटर -
यामध्ये ऑक्सिजन प्रेशर फ्लो, FIO2 हे पॅरॅमिटर रुग्णाची परिस्थिती समजून घेण्यास मदतगार असते. यामुळे हे स्मार्ट पद्धतीने मॅनेज होऊन ऑक्सिजन लिकेज झाल्यास ते ऑटोमॅटिक पद्धतीने थांबवले जाते. यासोबत ही सगळी माहिती चार्ट आणि बारग्राफ हे रिमोट पद्धतीने कनेक्ट केले असल्यास मोबाईलवर सर्व डेटा उपल्बध होऊ शकणार आहे. यामुळे डॉक्टर्स कुठेही असले तरी हे पाहून रुग्णाला मॉनिटर करू शकतात किंवा उपचार करू शकतात.
काही मिनिटाच्या प्रशिक्षणाची गरज -
याला 'प्राणसेतु'तील आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे हे व्हेंटिलेटर लावण्यासाठी एका साध्या ट्रेनिंगची गरज असते. हे ट्रेनिंग काही फार कठीण नाही. अगदी ऑनलाईन जरी वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला हे प्रशिक्षण दिले तर 10 ते 15 मिनिटात ते सहज समजून जाईल, अशा पद्धतीने हे बनवण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे.
नागपूरचे डॉक्टर आणि पुणेच्या इंजिनिर्सच्या टीमचे यश -
नागपूरचे बालरोग तज्ञ डॉ. सतिष देवपूजारी यांच्या नेतृत्त्वात सहा इंजिनियरांनी हे काम केले आहे. यामुळे यात काही विशेष बाबीकडे बारीक सारीक पद्धतीने लक्ष देण्यात आले आहे. हे नागपूर आणि पुणे येथील इंजिनियरच्या चमूने यात मोठ्या परिश्रमाने प्राणसेतु नावाचे व्हेंटिलेटर बनवले आहे.
ग्रामीण दुर्गम भागात ठरेल जीवनदायी -
ग्रामीण किंवा दुर्गम भागातही हे व्हेंटिलेटर छोट्या आरोग्य केंद्रांमध्ये सुद्धा प्रभावी पद्धतीने उपयोगी पडू शकतात. या सोबतच हे व्हेंटिलेटर रुग्णवाहिकेत सुद्धा ऑक्सिजन सिलेंडरला जोडून एक्स्टर्नल बॅटरीच्या साहाय्याने चालू शकते. यामुळे जिथे काही अद्ययावत दवाखाने पोहचू शकत नाहीत याठिकाणी जीवनदायी ठरणाऱ्या या व्हेंटिलेटरच्या साहाय्याने अद्ययावत दवाखान्यात पोहचवण्यापर्यंत मोठी मदत होऊ शकणार आहे.
हेही वाचा - मुंबईत गेल्या 4 महिन्यात 3203 किलो अमली पदार्थ जप्त; एएनसीची कारवाई