नागपूर - जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात कोरोना लसीकरण संथगतीने सुरू आहे. लसीकरण वाढवण्यासाठी गावोगावी जाऊन लसीकरण वाढवण्यासह तिसऱ्या लाटेतून लहान मुलांचा बाचाव करण्याचे डोस देण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. यात मागील काही दिवसात लसीकरणाचा साठा कमी झाल्याने लसीकरण मोहिमेत अडचण येत होती. मात्र आज (बुधवार) रात्री 50 हजार लसीची खेप येणार असल्याने लसीकरणाला गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गावांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. गावातील भेटीदरम्यान सध्या त्रिसूत्रीवर लक्ष दिले जात आहे. त्यामध्ये कोरोना आजाराची तीव्रता सांगणारी सहा मिनिटांची वॉकिंग टेस्ट, कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांसाठी आवश्यक उपचार पद्धती आणि तिसऱ्या संभाव्य लाटेमध्ये लहान मुलांचे कोरोनापासून कशा पद्धतीने संरक्षण करायचे, याबाबतचे मार्गदर्शन केले जात आहे. जिल्ह्यामध्ये संभाव्य तिसरा लाटेमध्ये मुलांनाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. यासाठी बालरोग तज्ज्ञ यांनी मार्गदर्शक सूचना तयार करून आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांकडून घरोघरी वितरण केले जाणार असल्याचे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.
लसीची 50 हजार डोस मिळणार
जिल्ह्यात आज 2 हजार 973 रेमडेसिवीर इंजेक्शनचे वितरण करण्यात आले. जिल्ह्याला 50 हजार लसी पोहोचणार असून यातून 25 हजार लसी शहरी भागात तर 25 हजार ग्रामीण भागासाठी वापरले जाणार आहे. यामध्ये नागरिकांना दुसरा डोस देण्यासाठी या लसीचा प्रामुख्याने वापर करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच गुरुवारी ओडिशा राज्यातील अंगुळ येथून चार ऑक्सिजन टँकर नागपुरला रेल्वेद्वारे पोहोचणार आहे. जिल्ह्यात 124 मेट्रिक टन ऑक्सिजन आज उपलब्ध झाले आहे.