नागपूर - कोरोनासह ओमायक्रॉनचा धोका संपूर्ण देशात झपाट्याने वाढतो आहे. गेल्या पाच दिवसात राज्यात मोठ्या संख्येने रुग्ण वाढ नोंदवण्यात आली आहे. राज्याच्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर होत आहे. नागपूरमध्ये गेल्या पाच दिवसांमध्ये 1 हजारांपेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे, यामध्ये 24 ओमायक्रॉन बाधित रुग्ण आहेत. रुग्ण संख्या वाढीस लागल्यामुळे येत्या काळात रुग्णालयांमध्ये रूग्णांची गर्दी वाढणार, असे भाकीत केले जात आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर शहरातील शासकीय, महानगरपालिका आणि खासगी रुग्णालयांसह किती खाटा (बेड्स) आणि व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा शहरातील सध्याच्या परिस्थितीत मुबलक खाटा उपलब्ध असल्याचे दिसून आले. ( Nagpur Health Administration Over Omicron Situation )
कोरोनाची दुसरी लाट ओसरून अवघे काहीच दिवस लोटले होते. विस्कळीत झालेलं जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येण्याची धडपड करत असतानाच पुन्हा कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटसह ओमायक्रॉन या नवीन विषाणूंचा प्रादुर्भाव वाढीस लागल्यानंतर पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान कोलमडून पडलेल्या आरोग्य व्यवस्थेचा लाचारपणा प्रत्येकाने जवळून बघितला आणि अनुभवला देखील आहे. बेड आणि ऑक्सिजन मिळावे याकरिता आप्ते स्वकीयांची धडपड आणि रुग्णांची तडफड अजून कुणीही विसरलेलं नाही. अशातच आता कोरोना पुन्हा धुमाकूळ घालतोय हे ऐकल्यानंतर सर्वांच्या मनात परिस्थिती भीषण झाल्यास कोणत्या रुग्णालयात, किती खाटा उपलब्ध आहेत, यासंबंधी चिंता सतावत आहे. नागपूर शहरात 17 हजारांपेक्षा अधिक बेड्स उपलब्ध आहेत. येथील आरोग्य परिस्थितीबाबत ईटीव्हीचा विशेष आढावा.
शासकीय रुग्णालयातील व्यवस्था -
नागपूर शहरात मेयो, मेडिकल आणि एम्स हे तीन मोठे शासकीय रुग्णालये आहेत. याशिवाय नागपूर महानगरपालिकेची स्वतंत्र आरोग्य व्यवस्था कार्यान्वित आहे. शासकीय आणि महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये एकूण 4325 खटांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात 3003 खाटा कोविडसाठी निश्चित करण्यात आली आहे. महानगरपालिकेचे 1626 बेडचा समावेश असून 380 व्हेंटिलेटर बेड्स आहेत. तर 152 नॉन व्हेंटिलेटर बेड्स आहेत. याशिवाय 993 हे ऑक्सिजन बेड्स आहेत.
![Nagpur District Administration](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14122424_governementbeds.jpg)
हेही वाचा - Nagpur School Closed : नागपुरातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत राहणार बंद - नितीन राऊत
खासगी रुग्णालयात उपलब्ध खाटा -
नागपूर शहराला मध्य भारतातील मेडिकल हब म्हणून ओळखले जाते. शहरात शेकडो लहान मोठे खासगी रुग्णालये कार्यरत आहेत. यामध्ये आजच्या घडीला 6408 बेडस उपलब्ध आहेत. त्यापैकी 5527 खाटा या कोरोना रुग्णांसाठी राखीव आहेत. यामध्ये 2407 ऑक्सिजन बेड, नॉन ऑक्सिजन 301 बेड आणि 355 व्हेंटिलेटर बेडचा समावेश आहे.
![Nagpur District Administration](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14122424_privatebeds.jpg)
ऑक्सिजनची स्थिती -
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना रुग्णांना एक-एक श्वास घेण्यासाठी अक्षरशः संघर्ष करावा लागला होता. ऑक्सिजनची कमतरता रुग्णांच्या जीवावर बेतली होती. तेव्हा प्रतिदिवसाला 178 मॅट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासत होती. मात्र, ही गरज भागवताना प्रशासना तारेवरची कसरत करावी लागली. आजच्या स्थितीत 26 पैकी 19 प्लांट सुरू झाले आहेत. दुसरीकडे बहुतांश रुग्ण गृहविलगीकरणात असल्याने ऑक्सिजनची मागणी सामान्य आहे. दुसऱ्या लाटेत आलेल्या अनुभवातून धडा घेत प्रशासनाकडून मेयो, मेडिकल आणि एम्समध्ये हवेतून शोषून घेणारे स्वतंत्र ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यापैकी मेडिकल येथे ऑक्सिजन प्लांट तयार आहे. केवळ सुरक्षा भिंत नाही म्हणून प्लॅन सुरू झालेला नाही. तर एम्समध्ये तयार करण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मेयो रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट व्यवस्थित काम करतो आहे. सर्व प्लांट सुरू झाल्यानंतर दरदिवशी 48 मॅट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे.
![Nagpur District Administration](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14122424_oxygen.jpg)
लसीकरणाची स्थिती -
नागपूर शहरात आतापर्यंत 33 लाख 94 हजार 495 नागरिकांचे लसीकरण झालेलं आहे. यामध्ये 20 लाख 29 हजार 757 लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहे तर 13 लाख 64 हजार 738 लोकांनी लसीचा एक डोस घेतला आहे. 15 ते 18 वयोगटातील 25725 तरुण वर्गाने लस घेतली आहे.
![Nagpur District Administration](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14122424_vaccination.jpg)