नागपूर : नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये राहणाऱ्या डॉक्टरांच्या निवासी वसतिगृहात एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणजेच मेडिकलच्या निवासी डॉक्टर (मार्ड) वसतिगृहातील बाथरूममध्ये अंघोळ करत असताना महिला डॉक्टरचा लपून व्हिडिओ तयार करणाऱ्या एका निवासी डॉक्टरला वसतिगृहातील इतरांनी रंगेहाथ पकडले आहे. त्या डॉक्टरला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा मार्डच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
बाथरूमच्या दारातून व्हिडीओ शूटिंग : मिळालेल्या माहितीनुसार मार्डच्या वसतिगृहात राहणारी द्वितीय वर्षाला असलेली एक महिला निवासी डॉक्टर आंघोळीला गेली होती. तेव्हा एक निवासी डॉक्टर बाथरूमच्या तुटलेल्या दारातून व्हिडीओ शूटिंग करत आहे, असे वसतिगृहात असलेल्या इतर डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच त्या डॉक्टरला थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो निवासी डॉक्टर तिथून पळून गेला. त्यानंतर महिला निवासी डॉक्टरने अधिष्ठाता कार्यालयात तक्रार केली आहे. या घटनेने नागपुर शहरात खळबळ उडाली आहे.
आरोपीला जामिन मंजूर- आरोप असलेल्या निवासी डॉक्टरला बोलावून त्याचा मोबाईल तपासला असता त्यात आक्षेपार्ह काहीच आढळले नाही. त्यामुळे मेडिकलचे अधिष्ठाता यांनी सहा सदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी सांगितले की, आरोपीला भारतीय दंड संहिता कलम 354 (व्हॉय्युरिझम) अंतर्गत अटक करण्यात आली आहे. आरोपीला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला. अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. महिला डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाल्याने आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा मिळावी, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
हेही वाचा :