नागपूर : ऑनलाइन गेमच्या नादात अडकून एका व्यापाऱ्याने तब्बल 58 कोटी रुपये गमावल्याची धक्कादायक घटना नागपूर शहरात घडली आहे. तक्रारदार नागपूर शहरातील मोठे व्यापारी आहेत. 58 कोटी रुपये गमावल्यानंतर त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करत गोंदिया येथे राहात असलेल्या आरोपीच्या घरावर धाड टाकली. आरोपीच्या घरातून पोलिसांनी आत्तापर्यंत 4 किलो सोने आणि 10 कोटीची रोकड जप्त केली आहे. आरोपी मात्र अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
आरोपीच्या घरावर छापेमारी : तक्रारदार नागपूर शहरातील मोठे व्यापारी असल्याची माहिती आहे. मात्र पोलिसांनी त्यांचे नाव गोपनीय ठेवले आहे. या व्यापाऱ्याने नोव्हेंबर 2021 ते 2023 दरम्यान विविध प्रकारच्या ऑनलाइन गेमच्या नादात 58 कोटी रुपये गमावले आहेत. आरोपीचे नाव अनंत जैन असून तो गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी आहे. नागपूर पोलिसांनी गोंदिया येथे आरोपीच्या घरावर छापेमारी करत मोठ्या प्रमाणात रोकड आणि सोन्याचे बिस्कीटे जप्त केली आहेत.
अशी झाली फसवणूक : तक्रारदाराने शुक्रवारी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारदाराने सांगितले की, आरोपी अनंत उर्फ सोन्दू नवरतन जैन याने त्यांना ऑनलाईन गेमिंग अॅपवर 24 तास बेटींग करून करोडो रूपये कमावता येतील असे प्रलोभन दिले होते. आरोपीने त्यांना ऑनलाईन बेटींग लिंकचे युझरनेम, पासवर्ड पाठवून त्यावर दिलेले पॉईंट परत होणार नाहीत असे सांगून बेटींग करण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर आरोपीने त्यांना ऑनलाईन बेटींग करण्याची सवय लावली. तक्रारदार त्यांचे पैसे रिकव्हर करण्यासाठी मित्रांकडून उधार पैसे घेवून आरोपीच्या सांगण्यावरून बेटींग करत होते. परंतु यामध्ये त्यांना काहीच फायदा होत नव्हता.
आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली : काही काळानंतर, बेटींगमध्ये फक्त आरोपीलाच फायदा होत असल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी आरोपीकडे आत्तापर्यंत गमावलेले पैसे परत मागितले तेव्हा आरोपीने तक्रारदारांना जीवे मारण्याची धमकी देत उलट त्यांनाच 40 लाख रुपयांची खंडणी मागितली. अखेर सर्व पर्याय संपल्यानंतर त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.
तब्बल 58 कोटींची फसवणूक : आरापीने लिंकमध्ये सेटींग आणि मॅन्युपुलेशन करून तक्रारदाराला बनावट ऑनलाईन लिंकद्वारे खेळण्यास भाग पाडले. याद्वारे त्याने तब्बल 58 कोटी 42 लाख 16 हजार 300 रुपयांनी फसवणूक केली आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे.
हेही वाचा :