नागपूर - रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या घराजवळ उभ्या असलेल्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये गुरुवारी 20 जिलेटीन कांड्या, एक धमकीचे पत्र तसेच चार नंबरप्लेट मिळून आल्या होत्या, दरम्यान याबाबत पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, याप्रकरणाचे नागपूर कनेक्शन समोर येत आहे. या गाडीमध्ये आढळून आलेले इमलशन एक्सप्लोजीव अर्थात जिलेटिन कांड्यांची निर्मिती नागपूरमधील सोलर एक्सप्लोजीव लिमिटेड कंपनीमध्ये झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान या स्कॉर्पिओमध्ये जी स्फोटके सापडली आहेत, त्या स्फोटकाला जोपर्यंत ब्लास्टिंग डिव्हाईस जोडले जात नाही, तोपर्यंत त्याचा स्फोट होऊ नकत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच हे एक्सप्लोजीव कंपनीकडून जेव्हा बाहेर पडतात तेव्हा ते एका प्रोटोकॉलनुसार बाहेर पडत असतात, ही स्फोटके कुठे जाणार आहेत, ते कशासाठी वापरण्यात येणार आहेत, याची सर्व नोंद कंपनीकडे असते. ही स्फोटके 25 किलोंच्या बॉक्समध्ये पॅक केली जातात, मात्र हे एकदा त्या बॉक्समधूम काढले गेले की त्याचा वापर कसा होतो, ते कुठे जातात हे सांगता येणार नाही. अशाच बॉक्समधून ही स्फोटके काढून कोणीतरी त्याचा दुरपयोग केल्याचा संशय सोलर एक्सप्लोजीव लिमिटेडचे चेअरमन सत्यनारायण नुवाल यांनी व्यक्त केला आहे.
लवकरच आरोपीला अटक करू
गावदेवी पोलीस ठाण्यांमध्ये यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, स्कॉर्पिओ जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये मिळालेल्या 4 नंबरप्लेट मधील एक, ही मुकेश अंबानी यांच्या ताफ्यातील एका गाडीशी मेळ खात असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. या गाडीतून मिळालेल्या पत्रातील मजकूर नेमका काय आहे, याबद्दल कुठलाही खुलासा पोलिसांनी केलेला नाही. मात्र, यासंदर्भात लवकरच आरोपीची धरपकड केली जाईल, असे मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.