नागपूर- कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता नागपुरात दोन दिवसीय जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. जनता कर्फ्यूला शनिवारी नागपूरकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तोच प्रतिसाद दुसऱ्या दिवशीही आज देखील पाहायला मिळत आहे. शहरातील रस्ते निर्मनुष्य झाल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठाही पूर्णतः बंद आहेत.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागपूर स्थानिक प्रशासनाकडून दोन दिवसीय जनता कर्फ्यू लागू करण्यात आला. त्याच अनुषंगाने संपूर्ण शहरात कडकडीत बंद पाळला जात आहे. या दोन दिवसीय जनता कर्फ्यूला नागपूरकरांचा चांगलाच प्रतिसाद पाहायला मिळत आहे. शहरातील मुख्य रस्ते निर्मनुष्य झाल्याचे चित्र आहे. शनिवार व रविवार बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी पहायला मिळते. मात्र बाजारपेठातील शांतता पाहता नागपूरकरांकडून या जनता कर्फ्यूला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांकडूनही नागपूरकरांना वारंवार आवाहन देखील केले जात आहे. एरवी शहरातील विविध चौक ही गर्दीने गजबजलेले असतात. जनता कर्फ्यू दरम्यान मात्र सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. त्यामुळे नागपूरकरांनी असाच प्रतिसाद दिला तर कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
रविवार हे शहरातील बाजारपेठांसाठी महत्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी बाजारापेठांमध्ये कमालीची वर्दळ देखील पाहायला मिळते. आजही बाजारपेठ बंद असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यावर फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहने व व्यक्तीच पाहायला मिळाल्या.
महापौर, मनपा आयुक्तांकडून जनतेला वारंवार जनता कर्फ्यूचे पालन करण्याचे आवाहन देखील केले जात आहे. नागपूरकरांचा असाचा प्रतिसाद पुढेही कायम राहिला तर शहरातील वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यास मदत होईल, हे सद्यस्थितीवरून दिसून येत आहे. विनाकारण स्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांकडून चोपही दिला जात असल्याचे पाहायला मिळाले.