नागपूर - शहराच्या सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या टेलर गल्लीत आज दुपारी केमिकलच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली होती. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या पथकांना यश आले आहे. मात्र, मलबा हटवताना एका महिलेचा जळालेला मृतदेह आढळून आला आहे. लताबाई काठरपवार असे या महिलेचे नाव आहे.
आग वेळीच नियंत्रणात -
नागपुरातील छावणी परिसरात एका दोन मजली इमारतीला भीषण आग लागली होती. अकराच्या सुमारास आग लागल्यानंतर ती आग दुमजली इमारतीत सर्वत्र पोहोचली होती. या इमारतीत बाईक पॉलिश करण्यासाठीचे केमिकल ग्राउंड फ्लोअरवर साठवले होते, तर दुसऱ्या माळ्यावर फटाक्यांचा साठा होता. तर तिसऱ्या मजल्यावर एक कुटुंब राहत होते. आगीने संपूर्ण इमारत व्यापल्याने मोठी जीवितहानी होण्याची शक्यता वाढली होती. मात्र, अग्निशमन विभागाच्या पथकाने चहुबाजूंनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, तो पर्यंत इमारतीमध्ये असलेले सर्व साहित्य जळून राख झाले होते. तळ मजल्यावरील केमिकलच्या दुकानात
ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे आग झपाट्याने पसरली. यावेळी दुसऱ्या मजल्यावरून फटाकेही फुटण्याचा आवाज येत होता. अग्निशमन दलाच्या 6 गाड्यांनी आजूबाजूच्या घरावरून पाण्याचा मारा केला आणि आग वेळीच नियंत्रणात आणली.
महिलेचा दुर्दैवी मृत्यू -
नागपुरात छावणी परिसरात आज दुपारी लागलेल्या आगीत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांना जळालेला अवस्थेत हा मृतदेह सापडला आहे. लताबाई काठरपवार असे मृत महिलेचे नाव आहे. त्या दुकानात साफसफाईचा काम करायच्या. आग लागली तेव्हा इतरांसह त्यांनीही बाहेर पळ काढला होता. नंतर पर्स आणि इतर साहित्य आणायला त्या परत आत शिरल्या त्यानंतर त्यांना बाहेर निघता आले नाही. एका आलमारीच्या मागे त्यांचा मृतदेह आढळला आहे.
हेही वाचा - हेमंत नगराळेंकडे पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त भार