नागपूर - खापा जवळील उमरी जमारपानी नाल्यावरील पुलाचा काही भाग मंगळवारी रात्री वाहून गेला. या पुलावर दिवसा वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, रात्रीच्या वेळेस या पुलाचा काही भाग वाहून गेल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
जिल्ह्याच्या खापा परिसरात चांगला पाऊस झाला. त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत असल्याने उमरी नाल्यावरील पुलाचा काही भाग वाहून गेला. आज सकाळी पुलाचा एक भाग वाहून गेल्याचे लक्षात आले.
हा जुना पूल कमी उंचीचा असल्यामुळे पावसाळ्यात अनेक वेळेला तो पाण्याखाली जायचा. त्यामुळे या ठिकाणी नवीन जास्त उंचीचा पूल बांधावा यासाठी येथील नागरिक मागणी करत होते. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले,असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. सध्या या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.