नागपूर : येथील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कल्यानेश्वर नगरात दुहेरी हत्याकांड समोर आले आहे. अनैतिक संबंधांच्या संशयातून एका व्यक्तीने त्याच्या पत्नीसह तिच्या कथित प्रेमीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली आहे. किरण बरमय्या आणि शिवा अशी खून झालेल्या मृतांची नावे आहेत. तर, कुंवरलाल बरमय्या असे आरोपीचे नाव आहे. अजनी पोलिसांनी त्याला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले होते. त्याने दिलेल्या कबुली जबाबानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
नागपूर शहर हे हळूहळू गुन्हेगारीचे केंद्र बनत चालले आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून कुंवरलाल बरमय्या याने पत्नी व मित्राचा खून केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याबाबत माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यानंतर लगेच जखमी असलेल्या किरण बरमय्या आणि शिवा यांना उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळावरूनच आरोपी कुंवरलाल बरमय्या याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. तेव्हा आरोपीने घातलेल्या हत्याकांडामागील कारणांचा उलगडा केला आहे. अजनी पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे. महत्वाचे म्हणजे नागपुरात दोन दिवसात तिघांची हत्या झाली आहे. काल कामठी मध्येही एका तरुणाची हत्या झाली होती.