नागपूर- १६ वर्षीय राज पांडे नामक विद्यार्थ्यांच्या खून प्रकरणात खळबळजनक खुलासा झाला आहे. या प्रकरणातील आरोपी सुरज रामभुज शाहू याने मृतकाच्या काका मनोज पांडे यांच्यासोबत असलेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी राजचा खून केल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण नागपूर जिल्हा हादरून गेला असून राज पांडे खून प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झाल्याने नागपूर पोलीससुद्धा थक्क झाले आहेत.
मृतक राजच्या काकांसोबत आरोपीचे वाद
आरोपी सूरज आणि मृतक राज हे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदिरा मातानगर या एकाच वस्तीत राहतात. गेल्या काहीं महिन्यांपासून कौटुंबीक कारणामुळे आरोपी सुरज हा मृतक राजच्या काकांवर चिडलेला होता. त्याला मनोजला दुःख देऊन नुकसान पोहचवायचे होते. या विचाराने आरोपी सुरज गेली अनेक दिवस संधीच्या शोधात होता. आरोपीने सुरूवातीला मनोजच्या मुलाचा काटा काढण्याचे ठरविले होते. परंतु, मनोजची मुले वयाने मोठी असल्याने ते शक्य होणार नाही हे समजल्यानंतर त्याने मनोजचा पुतण्या राजकडे आपलं लक्ष केंद्रीत केलं होतं.
खून करण्यामागे अनेक वेगवेगळी कारण
गुरूवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सूरजने राजला आपण क्रिकेट खेळायला जाऊ, असे बोलून त्याला सोबत घेतले. सूरजच्या दुचाकीने दोघेही हुडकेश्वर हद्दीत आणि कुही तालुक्याच्या सिमेवर असलेल्या चिकना गावच्या जंगलात नेले. निर्जनस्थळी नेऊन राजचा खून केला. आरोपीच्या मोबाईल लोकेशनच्या मदतीने पोलीस त्याचा शोध घेत होते. सुरवातीला सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नंतर बुटीबोरीकडे आरोपीचे लोकेशन मिळत होते. पोलीस तिथे पोहचण्यापूर्वीच तो तिथून पळाला. अखेर बोरखेडी नाक्याजवळ पोलिसांनी सूरजला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने राजचा खून केल्याचे मान्य केलं. मात्र, खून करण्यामागे अनेक वेगवेगळी कारण तो पोलिसांना सांगत होता
आरोपीने मागितली अघोरी खंडणी
आरोपी सुरज याने राजचे वडील राजकुमार पांडे यांना फोन केला. ‘तू तुझ्या भावाचा खून कर आणि त्याचे कापलेल्या मुंडक्याचे फोटो मला व्हाट्सएप कर तेव्हाच तुझ्या मुलाला सोडणार अन्यथा राजचा खून करणार, अशी अघोरी खंडणी आरोपीने राजच्या वडिलांकडे मागितली. मात्र, आरोपी हा आपल्या परिचित असल्याने त्यांनी त्याची समजूत काढण्यात वेळ वाया घालवला.
पोलिसांनी तात्काळ माहिती दिली असती तर
राजचे अपहरण झाल्याच्या अनेक तासानंतर राजकुमार पांडे हे एमआयडीसी पोलिसांना या माहिती दिली. त्याआधी ते आरोपी सुरजसोबत सतत फोनवरून संपर्कात होते. त्यांनी अनेक वेळा सुरजची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकणार नाही हे समजल्यावर अखेर त्यांनी एमआयडीसी पोलिसांनी घटनेची सूचना दिली, मात्र तोपर्यंत आरोपीने राजला संपवलेलं होत.