नागपूर - येथील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही गुंडानी एका गुंडाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाहन चोरीतून मिळालेल्या पैशाच्या वाटणी निर्माण झालेल्या वादातून ही घटना घडली. सनी जंगीड असे मृत तरूणाचे नाव आहे. या प्रकरणाशी निगडीत एका आरोपीने सोमवारी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. महत्वाचे म्हणजे मृत आणि आरोपी वाहन चोरीच्या धंद्यात गेल्या दोन महिन्यांपूर्वी भागीदार होते.
सनी जंगीड, प्रशिल जाधव उर्फ मोनू रायडर आणि ललित रेवतकर हे तीन जण वाहन चोरीच्या गुन्ह्यात सक्रिय भागीदार होते. काही महिन्यांपूर्वी हे तिघेही सोबत वाहन चोरायचे. मात्र, पैशाच्या वादातून तिघेही वेगळे झाले. यापैकी प्रशिल हा रोहित रामटेकच्या टोळीत सहभागी झाला. तर सनीने लकी तेलंगची टोळी निवडली. यादरम्यान, रोहित रामटेके आणि त्याच्या साथीदारांवर एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याचा गुन्हा नोंद झाला. पीडित तरुणीला सनी आणि त्याच्या लोकांनी पाठबळ दिल्याचा संशय प्रशिल याला होता. शिवाय वाहन चोरीच्या एका गुन्ह्यात पोलिसांना प्रशिल आणि त्याच्या साथीदारांची नावे सांगितल्याचा संशय त्याला होता.
दोन दिवसांपूर्वी ज्या वेळी सनी जंगीडचे अपहरण झाले. यावेळी तो त्याच्या परिचित व्यक्तिच्या अंत्यसंस्कारासाठी गेला होता. तिथून घरी परत येत असताना त्याला आरोपींनी त्याला एका मोपेडवर बसवून घेऊन गेले. रात्री उशिरापर्यंत सनी घरी परतला नाही म्हणून त्याच्या आईने हुडकेश्वर पोलीस ठाण्यात यासंदर्भांत पोलिसांना माहिती दिली. सनीची आई नंदा जंगीड यांच्या तक्रारीवरून पोलीस या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.
आरोपींनी सनीला शहराच्या सीमेवर असलेल्या बेसा येथील टुंडा मारुती या परिसरात घेऊन गेले. तिघे तिघांनी मिळून सनीची निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली. दुसरीकडे हुडकेश्वर पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला असता एका आरोपीने आत्मसमर्पण केल्यानंतर संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट झाला. तर हुडकेश्वर पोलीस पुढील तपास करत आहेत.