नागपूर - येथील सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गुंडाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. निलेश राजेश नायडू (वय-३२) असे मृताचे नाव आहे. काल (सोमवारी) दुपारी मृत आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. त्यावेळी निलेशने आरोपीला बघून घेण्याची धमकी दिली होती. निलेश आपल्याला ठार मारेल या भीतीने पाच आरोपींनी मिळून निलेश नायडूचा खून केला. आरोपींमध्ये मयुर दिलीप शेरेकर (वय-३२), सागर विक्रमसिंग बग्गा (वय-२४), गोविंद भागवत डोंगरे (वय-३२), विशाल नामदेव गोंडाणे (वय-३३) आणि आशिष सदाशिव बंदेकर (वय-२८) यांचा समावेश आहे.
काय आहे घटना -
नागपूर शहरातील सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लंडन स्ट्रीटजवळ एका गुंडाची पाच जणांना मिळून धारदार शस्त्राने हत्या केली. मृत निलेश नायडू हा गुंड प्रवृत्तीचा होता. त्याचा लंडन स्ट्रीट परिसरातील मोबाईल शॉपीचालक मयूर शेरेकर नावाच्या व्यक्तीसोबत वाद झाला होता. त्यावेळी मृत निलेशने मयूरला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे मयूर घाबरलेला होता. निलेश आपल्याला मारेल या भीतीने मयूरने चार मित्रांच्या मदतीने निलेशला निर्जनस्थळी घेरून त्याला मारहाण केली.
हेही वाचा - कुख्यात गँगस्टर रवी पुजारीला 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडी
आरोपींनी निलेशवर चाकूने वार केले. यात त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपींनी तेथून पळ काढला. संध्याकाळी उशिरा सोनेगाव पोलिसांना या संदर्भात माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. तपासादरम्यान, मयूर नावाच्या एका व्यक्तीसोबत मृत निलेशचा वाद झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी मयूरला ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्याने चार मित्रांच्या मदतीने निलेशचा खून केल्याची कबुली दिली आहे.
मृत निलेश तीन दिवसांपूर्वीच आला होता कारागृहाबाहेर -
निलेश नायडू हा कुख्यात गुंड होता. त्याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न, लुटमार आदी गंभीर गुन्हे दाखल होते. खंडणीच्या गुन्ह्यात त्याला अटक झाली होती. तो शुक्रवारीच जामिनावर कारागृहाबाहेर आला होता. तो बाहेर येताच पुन्हा कुणालाही धमकी देण्याचे काम सुरू केलं होते. मात्र, यामुळे त्याला स्वतःचा जीव गमवावा लागला.