नागपूर : गेल्या २४ तासात नागपुरातील चौघांची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येच्या दोन घटना नागपूर शहरात घडल्या आहेत. तर दोघांची हत्या ही नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथे करण्यात आली. मृतदेह वर्धा जिल्ह्यातील तळेगाव (श्यामजी पंथ) येथील नदीपात्रात फेकून दिले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संदर्भात नागपूर शहर, ग्रामीण किंवा वर्धा पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली आहे.
जुन्या भांडणातून हत्येची घटना : पहिली घटना ही जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. जुन्या भांडणातून हत्येची घटना घडली आहे, असे सांगण्यात येत आहे. एका अल्पवयीन आरोपीने शेखर नामक व्यक्तीची हत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. रात्री पोलीस पथक गस्तीवर असताना मोतीबाग परिसरातून महिला मुलाच्या मागे धावताना दिसून आले. दरम्यान गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी महिलेची चौकशी केली तेव्हा अल्पवयीन मुलाने कचरा वेचणाऱ्या शेखरचा तलवारीने खून केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर जरीपटका पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. शेखरने काही दिवसांपूर्वी त्या अल्पवयीन मुलाला मारले होते. त्याचा राग मनात ठेवून अल्पवयीन मुलाने रात्री झालेल्या वादातून शेखरवर तलवारीने वार केला. ज्यात शेखरचा मृत्यू झाला आहे, असे सांगण्यात आले. जरीपटका पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली आहे.
बहिणीची केली हत्या : दुसरी घटना ही नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पडोळेनगर या भागात घडली आहे. आरोपी सूरज लक्ष्मणरावजी रक्षक (४५) याने त्यांच्यासोबत राहणाऱ्या बहिणीची हत्या केली आहे. खुशी किरण चौधरी (३८) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. आरोपी सूरज व खुशी यांच्यात घरगुती कारणावरून भांडण झाले. तेव्हा सुरजने खुशीला हात बुक्क्यांनी नाकावर, तोंडावर जबर मारले त्यात खुशीचा मृत्यू झाला. याप्रकरणी फिर्यादी पियुष रक्षक यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
दोघांची हत्या कुणी व का केली : हत्येच्या तिसऱ्या घटनेबाबत फारशी माहिती पुढे आलेली नाही. गेल्या दोन दिवसांपासून नागपूर शहरातील सीताबर्डी आणि सोनेगाव हद्दीतून बेपत्ता असलेल्या दोन मित्रांची हत्या केल्यानंतर, मृतदेह वर्धा जिल्ह्यातील तळेगाव (श्यामजी पंथ) येथील नदी पात्रात फेकून देण्यात आला आहे. अमरीश गोले आणि निराला कुमार जयप्रकाश सिंग असे हत्या झालेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांची हत्या ही कोंढाळी परिसरात करण्यात आल्याचा अंदाज आहे.