नागपूर - सोशल मीडियावर एकमेकांच्या विरोधातली शेरेबाजी आणि दादागिरीच्या वादातून नागपूरात एकाचा खून झाला आहे. अशोक नहारकर असे मृताचे नाव आहे. ही घटना अंबाझरी हद्दीतील पांढराबोडी सुदर्शन मंदिराजवळ, ट्रस्ट लेआऊट येथे घडली. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
या घटनेतील मृताच्या मुलांचा काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांशी वाद झाला होता. त्यातून सोशल मीडियावर एकमेकांच्या विरोधात पोस्ट टाकण्यात आली. ज्यामुळे हा वाद पुन्हा उफाळून आला. त्यानंतर काही आरोपी अशोक नहारकर यांच्या घरी गेले. अचानक झालेल्या हल्यामुळे अशोक नहारकर यांचे संपूर्ण कुटुंब भयभीत झाले होते. त्याचवेळी आरोपींनी नहारकर यांचा मुलगा रितेशवर धारधार शस्त्रांनी वार करायला सुरुवात केली. तेव्हा अशोक नहारकर मधे आल्याने ते गंभीर जखमी झाले. ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली. मुन्ना महातो, त्याचा मुलगा आरोपी रामु महातो आणि चेतन महातो अशी आरोपींची नावे आहेत. हे तिघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.