नागपूर - उशीरा का होईना पण राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. मान्सूनच्या आगमनाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. विदर्भात मात्र, पावसाच्या सरी कोसळण्यासाठी आणखी ३ ते ४ दिवस वाट बघावी लागेल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक एम. एल. साहू यांनी व्यक्त केला आहे.
एरवी १ जून दरम्यान कोकणमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यानंतर सामान्यता राज्यात पाच ते सात जून दरम्यान पहिल्या पावसाचे आगमन होत असते. त्यानंतर १० जूनपर्यंत विदर्भात सुद्धा मान्सूनचे आगमन व्हायचे. मात्र, यावर्षी वायू वादळामुळे पावसाचे आगमन १५ दिवसांनी उशिरा झाले आहे. नुकतेच पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे. मात्र, विदर्भात मान्सूनचा पहिला पाऊस येण्याकरिता आणखी ३ ते ४ दिवसांचा विलंब लागणार आहे.
सध्या पश्चिम बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मान्सून पूर्व पावसाच्या सरी कोसळण्याची दाट शक्यता आहे. तरी मान्सूनचा पहिला पाऊस २२ जून नंतरच येणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक एम. एल. साहू यांनी व्यक्त केला आहे.