नागपूर - अयोध्येतील राम मंदिरासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. रामटेकच्या गडमंदिराचा निधी का थांबवला? असा प्रश्न भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहले आहे.
रामटेक येथील गडमंदिराचा विकास निधी थांबवण्यात आला आहे. त्यामुळे येथील माजी आमदार संतप्त झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी रामटेकच्या गडमंदिराचा विकास व्हावा, यासाठी लक्ष घातले आणि पाठपुरावाही केला होता. मात्र, आता त्यांचा पक्ष सत्तेत असूनही बाळासाहेबांच्या सुपुत्रांनी विकास निधीच थांबवला आहे, अशी टीका रेड्डी यांनी केली.
हेही वाचा - 'सिंधियांनी स्वार्थासाठी लोकांचा विश्वासघात केला'
महाराष्ट्रातील मंदिराचा निधी कमी करून अयोध्येच्या राम मंदिराला मुख्यमंत्र्यांनी निधी दिला, असा आरोप यांनी केला. ३० कोटीच्या कामांचा निधी थांबवण्यात आल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्र लिहिले आहे. गडमंदिराच्या कामाचा निधी न थांबवता काम पूर्णत्वास आणावे, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे.