नागपूर : उपराजधानीत हिंगणा एमआयडीसी येथील एका कंपनीला आग लागली आहे. निपाणी गावाजवळ असलेल्या कटारिया ग्रुपमध्ये ब्लास्ट झाल्यानंतर आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आगीत 3 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आणखी 10 ते 12 कामगार आत अडकले आहेत, अशी भीती व्यक्त केली जाते आहे. हिंगणा एमआयडीसीतील सोनेगाव निपाणी येथे कटारिया अॅग्रो प्रा. लि. या कंपनीत आग लागल्याने 3 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला,
जखमींना तातडीने चांगले उपचार : या घटनेबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत समन्वय साधण्यास सांगितले आहे. घटनेतील जखमींना तातडीने चांगले उपचार मिळावेत, असे निर्देशही देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी मुंबई येथे बैठकीत असले तरी ते सातत्याने समन्वय साधून आहेत. तहसिलदार हे तातडीने घटनास्थळी पोहोचत आहेत.
मॉलमध्ये भीषण आग : ठाणे शहरातील घोडबंदर रोडवरील एका मॉलमध्ये 18 एप्रिलला संध्याकाळी भीषण आग लागली होती. यात अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील कापूरबावडी येथे सर्व्हिस रोडवर असलेल्या सिनेवंडर मॉल तसेच ओरियन पार्क या दोन्ही मॉलमध्ये अचानक मंगळवारी रोजी रात्री अचानक आग लागली होती.आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होते. आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास सिनेवंडर मॉलच्या लागत असलेल्या ओरियन बिझनेसपार्क या इमारतीच्या पहिल्या माळ्यावर आग लागल्याने बाजूलाच असलेल्या सिनेवंडर मध्येही आग पसरली होती. अग्निशमन दलाचे अधिकारी, जवान, फायर वाहन, रेस्क्यू वाहन, वॉटर टँकर, जम्बो वॉटर टँकर वाहनासह उपस्थित होते. या आगीमुळे घोडबंदर रोडकडे जाणाऱ्या दिशेने आणि घोडबंदर रोडवरून येणाऱ्या दिशेने दोन्ही मार्गीकांवर मोठ्या प्रमाणात बघायची गर्दी जमली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.