नागपूर: 'महारेल' या महाराष्ट्र शासन तसेच रेल्वे मंत्रालयाच्या संयुक्त उपक्रमाद्वारे सुमारे ३०६ कोटी रुपयांच्या ६ उड्डाणपूलांचे (आरओबी) लोकार्पण तसेच ६०० कोटी रुपयांच्या उड्डाणपुलाचा भूमिपूजन कार्यक्रम आज(शनिवारी) अजनी येथे केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांनी राज्यातील विकासकामांवर प्रकाश टाकला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते.
तीन लेनचा दुहेरी ब्रिज मंजूर: मंजूर केलेल्या 25 'आरओबी'मध्ये आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने नागपूर शहरातील अजनी रेल्वे स्थानकावरील सहा पदरी दुहेरी केबल स्टेड उड्डाणपुलाचे भूमिपूजन करण्यात आले. या संदर्भात माहिती देताना गडकरी यांनी सांगितले, अजनीचा पूल ब्रिटिशकालीन असून तो 1927 मध्ये बांधला गेला होता. या पूलावरील जड वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने आता बंद केली असून महाराष्ट्र शासनाने महारेलच्या माध्यमातून येथे तीन लेनचा दुहेरी ब्रिज मंजूर केला आहे. याच्या दोन्ही बाजूला 1.5 मीटरचे फुटपाथ देखील मंजूर केले आहेत. या पुलावर होणाऱ्या एलईडी लाइट्स सुशोभीकरणामुळे हा ब्रिज एक 'आयकॉनिक ब्रिज' ठरणार आहे. त्यांनी या पुलाच्या बांधकामाच्या भूमिपूजनाबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार मानले.
एकूण 5 आरओबीचे आज भूमिपूजन: अजनीच्या पुलाव्यतिरिक्त अमरावती-बडनेरा, अमरावती-निंभोरा, अमरावती-नरखेड या अमरावती जिल्ह्यातील तर वर्धा जिल्ह्यातील आर्वी रोड, यवतमाळ जिल्ह्यातील वणी-वरोरा, मांजरी ते पिंपळखुटी सेक्शन अशा एकूण 5 आरओबीचे आज भूमिपूजन संपन्न झाले. याव्यतिरिक्त नागपूर जिल्ह्यातील इतवारी सेक्शन, डेप्टी सिग्नल, दिघोरी ते इतवारी, नाईक तलाव ते बांगलादेश या आरोबींचे त्याचप्रमाणे सांगली, सोलापूर, लातूर, बुलढाणा जिल्ह्यातील काही आरओबीच्या बांधकामाला देखील मंजुरी देण्यात येत आहे, अशी घोषणा गडकरी यांनी यावेळी केली.
५०० कोटींच्या नवीन कामांची घोषणा: केंद्रीय रस्ते निधी मधूनच नागपूर शहर आणि जिल्ह्यात सुमारे ५०० कोटी रुपयांच्या तरतुदीची नवीन कामांची घोषणासुद्धा गडकरी यांनी याप्रसंगी केली. या कामांमध्ये प्रामुख्याने झिरो माइल-टेकडी-ते सायन्स कॉलेजचा अंडरपास, राधे मंगलम कार्यालय-रिंग रोड ते ऑरेंज सिटी रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण, शताब्दी चौक ते मनीष नगर रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण, मंगलमूर्ती चौक ते जयताळा लास्ट बस स्टॉप रस्त्याचे सिमेंटीकरण, चौधरी मेडिकल-झिंगाबाई टाकळी ते अवस्थी नगर या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण, शंकरपूर-मिहान-चिंचभवन रस्त्याचे सिमेंटीकरण, प्लायवूड ते भेंडे लेआउटची सुधारणा, एअरपोर्ट ते एचबी टाउनचे सिमेंटीकरण, बोरगाव चौक ते गोरेवाडा येथील रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण, बुटीबोरी-उमरेड रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण, वाडी-खडगाव-लावा या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येईल. त्याचप्रमाणे नागपूर जिल्ह्यामध्ये दहेगाव-इसापूर येथील पुलाच्या बांधकामाचा समावेश आहे.
100 आरोबीची उभारणी करणार: याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, महारेलमुळे केवळ विदर्भातच नव्हे तर राज्यामध्ये रेल्वेच्या पायाभूत सुविधांचे रूप बदलत आहे. जनतेच्या पैशाची तसेच इंधनाची बचत होण्यासाठी, त्याचप्रमाणे फाटक विरहित वाहतूक होण्यासाठी 100 आरोबींची उभारणी महारेलद्वारे करण्यात येणार आहे.
महारेलकडून बसपोर्ट तयार करणार: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, नागपूर तसेच अजनी या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास रेल्वे मंत्रालयाद्वारे केला जात असून ही स्थानके जागतिक दर्जाची बनवले जात असल्याचा उल्लेख केला. नागपूरचे बसस्थानक-बसपोर्ट सुद्धा प्रवाशांच्या सुविधे करिता अत्याधुनिक सुविधांनी युक्त तयार करण्यासाठी महारेल काम करेल अशी घोषणा त्यांनी केली.
असा तयार होईल अजनीचा पूल: अजनी पूल दोन टप्यात बनणार असून तीन लेनचा पहिला पूल बनल्यानंतर सध्याचा अस्तित्वात असलेला पूल तोडण्यात येईल. त्यानंतर दुसरा ब्रिज बनविण्यात येणार आहे. पहिल्या पुलाची निर्मिती जून 2024 मध्ये तर दुसऱ्या पुलाचे बांधकाम मार्च 2025 च्या अखेर पूर्ण होईल, असे देखील गडकरींनी सांगितले.
हेही वाचा: Devendra Fadnavis In Court: देवेंद्र फडणवीस न्यायालयात हजर, काय आहे प्रकरण?