नागपूर Maharashtra winter assembly session 2023 - विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस हा नवाब मलिक यांच्या अजित पवार गटातील प्रवेशानं गाजला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहित नवाब मलिक यांच्या महायुतीमधील प्रवेशाबाबत नकारघंटा कळविली आहे. दुसरीकडं विरोधी पक्षांनी भाजपाला लक्ष्य करत ईडीनं चौकशी करूनही अनेक नेते भाजपामध्ये सामील झाल्याचा टोला लगावला आहे.
Live updates
- नवाब मलिक आमचे सहकारी आहेत. त्यांची भेट घेतली म्हणजे ते आमच्यात आल्याचा अर्थ होत नाही. विरोधकांनी आम्हाला सल्ले देण्याची गरज नाही, असा टोला राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल पटेल यांनी विरोधकांना लगावला. ते विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलत होते.
- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, मी कालही सांगितलेले आहे की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नौटंकी करत आहेत. इकबाल मिरचीसोबत प्रफुल्ल पटेल यांचे संबंध आहेत. ईडीने त्यांची संपत्ती जप्त केली आहे. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसू शकतात. नरेंद्र मोदी यांनी 70 हजार कोटींचा आरोप ज्यांच्यावर केला, ते अजित पवार त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. मग या सर्व प्रकरणात नवाब मलिक वेगळे कशासाठी, असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. आम्हाला देशप्रेम सांगायची काही गरज नाही. त्याला डायव्हर्ट करू नका. जनता तुमच्याकडून घेणारच आहे. तुमची नौटंकी बंद करावी. लोकांच्या समोर वास्तव येणार आहे, असा टोला नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. ते माध्यमांशी बोलत होते.
- विधानसभेत अवकाळी पावसावरून चर्चा सुरू आहे. यावर बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या कांदे निर्यातबंदीवरून जोरदार टीका केली. विरोधी पक्षनेते म्हणाले, कांदा निर्यातबदीवरून विरोधक आक्रमक झाले आहे. कांदा उत्पादकांना न्याय मिळत नाही. शेतकरी रस्त्यावर आले आहेत. शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळाली नाही. राज्यातील शेतकरी संकटात आहे.
- विजय वडेट्टीवार म्हणाले की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काल बांधावर जाऊन आले आहेत. शेतकऱ्यांची परिस्थिती त्यांच्या लक्षात आली असेल. या सभागृहाकडे शेतकरी डोळे लावून बसला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहे. आज आपल्या पदरात काही पडेल, अशी त्यांची भावना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी. परंतु आजच्या कामकाजाशी हा विषय निगडित नाही. काल या विषयावर मुद्दा उपस्थित केला होता, त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे. स्थगन प्रस्तावही दिला आहे. त्यामुळे विरोधी पक्षाची सूचना नाकारत असल्याचे अध्यक्षांनी सांगितले. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत
- विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक झाले आहेत. नियम ५७ अन्वये प्रश्नोत्तराचा तास स्थगित करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करावी, असा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी अधिवेशनात प्रस्ताव मांडला. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले. साडेसात लाख हेक्टर शेती उध्वस्त झाली आहे. द्राक्षापासून संत्र्याचे नुकसान झाल्याचा प्रश्न विधानसभा अध्यक्षांनी प्रश्न मांडला. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी चर्चेचा प्रस्ताव नाकारला. त्यानंतर विरोधकांची सभागृहात घोषणाबाजी केली.
- विरोधकांकडून सरकारविरोधात घोषणाबाजी- कापसाला भाव मिळण्यासाठी विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करत घोषणाबाजी केली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कापसाला १४ हजार रुपये भाव देण्याची मागणी केली आहे. यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार अंबादासा दानवे यांच्यासह इतर आमदारांनी गळ्यात कापसाच्या माळा घालत घोषणाबाजी केली.
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लेटर बॉम्बनं आजही उमटणार राजकीय पडसाद उमटणार आहेत. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच पत्र मिळालं. ते पत्र मी वाचलं आहे. नवाब मलिक हे सभागृहात पहिल्यांदाच आले होते. त्यांची काय भूमिका आहे, हे कळाल्यावर मी बोलणार आहे. मलिक यांनी अजून स्वत:चे मत दिलेले नाही. नवाब मलिक कुठे बसले आहेत, हे टीव्हीवरच दाखविण्यात आले. ते कुठे आज बसणार आहे, हे माहित नाही.
नवाब मलिक यांच्यावर मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप आहे. त्यांना वैद्यकीय कारणास्तव फेब्रुवारी २०२२ मध्ये जामीन मंजूर करण्यात आला. जामीन मिळाल्यानं नवाब मलिक हे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशात गुरुवारी सहभागी झाले. ते अजित पवार गटाच्या आमदारांसाठी असलेल्या बाकावर बसल्यानं महायुतीत बेबनाव सुरू झाल्याचे चित्र आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा अजित पवार यांना पत्र लिहित नवाब मलिक यांना महायुतीबाबत घेण्यास नकार दिला आहे. त्यांच्या पत्रावरून राजकीय वादळ निर्माण झाले आहे.
भाजपा ही भ्रष्ट जुमला पार्टी आहे. माजी मंत्री नवाब मलिक यांचा अपमान करून अजित पवार गटाची कोंडी केली जात आहे-खासदार सुप्रिया सुळे
विधेयक दुरुस्तीमुळे राज्याला हजारो कोटींची मिळणार कर- अर्थमंत्री अजित पवार यांनी कॅसिनो, ऑनलाईन बेटिंग, अश्वशर्यती आणि लॉटरीला जीएसटीच्या २८ टक्क्यांच्या वर्गवारीत आणणारे सुधारित विधियेक सभागृहात मांडले. सुधारित विधेयकामुळे नवा कायदा अस्तित्वात येणार आहे. त्यामुळे राज्याच्या आर्थिक उत्पन्नात मोठी भर पडण्याची आशा आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार राज्याला हजारो कोटी रुपयांचा कर मिळणार आहे.
आदित्य ठाकरेंची बदनामी करण्याचा प्रयत्न- गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियानच्या आत्महत्येप्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, मुंबई पोलिसांनी या प्रकरणी तपास बंद करण्याचा अहवाल दिला असताना केवळ आदित्य ठाकरेंची बदनामी करण्यासाठी हा मुद्दा उपस्थित केला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केला.
हेही वाचा-