नागपूर - जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. आमदार निलम गोऱ्हे, विनायक राऊत, राहूल शेवाळे यांच्या उपस्थितीत मुंबईतील शिवसेना भवनमध्ये या मुलाखती पार घेण्यात आल्या. यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील देखील काही इच्छुक उमेदवारांचा मुलाखती घेण्यात आल्या. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात उमेदवाराची चाचपणी करुन शिवसेना भाजपवर दबाव निर्माण करत आहे, की स्वबळाची तयारी करत आहे, असा संभ्रम राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे.
हेही वाचा - सातारा उमेदवारी बाबत पृथ्वीराज चव्हाणांचे मोठे विधान, म्हणाले..
जिल्ह्यातील १२ जागासाठी एकूण दीडशे लोकांनी मुलाखती दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघात सेनेची पक्ष संघटना म्हणून फारशी ताकद नाही. ही बाब सेनेच्या इच्छुक उमेदवारांनी देखील मान्य केली आहे. मात्र, या विभागातील विविध क्षेत्रात कार्य केल्याने अतिरिक्त मुद्दे घेऊन आम्ही निवडणूक लढवणार असल्याचे, सेनेच्या इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीनंतर सांगितले.