नागपूर - महाज्योती संस्थेंतर्गत ओबीसीच्या विद्यार्थ्यांना एमफिल आणि पीएचडीसाठी फेलोशिप देण्याची मागणी करण्यात आली. महाज्योती संस्थेच्या बैठकीला मंत्री विजय वडेट्टीवार येणार असल्याने मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी समाजकल्याण विभागासमोर आंदोलन केले. यावेळी सारथी आणि बार्टीच्या धरतीवर फेलोशिप द्यावी, ही मागणी करण्यात आली. चर्चेअंती 200 विद्यार्थ्यांसाठी फेलोशिप देण्यासाठी जाहिरात काढणार असल्याचे आश्वासन मदत व पुनर्वसन मंत्री तथा बहुजन समाज कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.
हेही वाचा - विरोधी पक्ष नेते काँग्रेस पक्षाला भाजपच्या दावणीला बांधत आहेत - यशवंत जाधव
फेलोशिपच्या मागणीकडे वारंवार दुर्लक्ष होत आहे. यामुळे मराठवाड्यातील अनेक विद्यार्थी उपराजधानीत आले होते. यावेळी भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव कल्याण देशपांडे, ओबीसी आघाडी नागपूर शहर अध्यक्ष रमेश चोपडे, मराठवाडा विद्यापीठ संशोधक विद्यार्थी महेंद्र मुंडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मंत्री वडेट्टीवार यांच्याशी बैठक झाली. या सात प्रमुख मागण्यांपैकी दोन मागण्या मान्य करण्यात आल्या. यावेळी 200 विद्यार्थ्यांसाठी लवकर जाहिरात काढल्या जाईल, असे आश्वासन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे निर्णय
यावेळी विमुक्त भटक्या समाजाला एमएससी सायन्स आणि एमफीलसाठी दिली जाणारी फेलोशिप तात्काळ चालू करण्याचे आदेश त्यांनी वडेट्टीवार यांनी दिले. या अभ्यासक्रमांना फेलोशिप मिळत नव्हती. यानिमित्ताने ही बाब समोर आल्याने 607 कोर्सेसना पुढील सत्रापासून फोलोशिप देणार असल्याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. तसेच, ओबीसी विद्यार्थ्यांना कमर्शियल पायलट होता येईल, यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. खाजगी एव्हिएशन कंपनीशी बोलणे सुरू आहे. लवकरच करार करण्यात येईल. तसेच, महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे आश्वासन देत, या वर्षापासून नीट स्पर्धा परीक्षा व पोलीस भरतीसाठीसुद्धा मार्गदर्शन केले जाणार, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.
मंत्र्यासमोर डोळ्यात रडू आले
यावेळी आंदोलनात परभणी जिल्ह्यातील एक युवक आला. बाबू अंकुश राठोड, असे युवकाचे नाव आहे. तो विमुक्त भटक्या प्रवर्गात मोडतो. एमफिलसाठी स्कॉलरशिप बंद असल्याने त्याने मंत्री वडेट्टीवार यांच्यासमोर आपली समस्या मांडली. त्यात आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने चार हजराचे कर्ज आहे. रुमचे भांडे देणे बाकी आहे. यावेळी योजना सुरू होईल तेव्हा लाभ मिळेल, असे वडेट्टीवर यांनी म्हणताच विद्यार्थ्याला रडू कोसळले. यावेळी या भटक्या विमुक्त जातीची स्कॉलरशिप बंद असल्याचे सांगताच तात्काळ आदेश देत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्कॉलरशिप सुरू करण्याचे आदेश दिले.
हेही वाचा - राष्ट्रवादीचे लक्ष्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर; शरद पवारांनी घेतला आढावा