नागपूर - सध्या कोरोनाच्या भीतीमुळे प्रत्येकजण खबरदारी घेताना दिसत आहे. कोरोनावरील उपाययोजना करण्यासाठी देशात नवनवे प्रयोग करण्यात येत आहेत. अशाप्रकारे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाअंतर्गत येत असलेल्या नागपूर रेल्वे स्थानकात खराब आणि टाकाऊ पेपर प्रिंटर मशीनपासून नोटांचे निर्जंतुकीकरण करणारी मशीन बनवण्यात आली आहे. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ही कमाल केली असून, अशाप्रकारचा देशातील हा पहिलाच प्रयोग आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रत्येकजण विशेष काळजी घेत आहे. ऐरवी स्वच्छतेच्या बाबतीत उदासीन असलेले व्यक्तीसुद्धा आता खबरदारी घ्यायला लागले आहेत. सतत स्वतःला सॅनिटाइज करण्यासाठी प्रत्तेक व्यक्ती धडपडत आहे. मात्र, ज्या ठिकाणी रोख पैशाचे व्यवहार होतात त्या ठिकणी संक्रमणाची भीती सर्वाधिक असते. रेल्वे स्थानकात तर पूर्ण व्यवहारच रोख पैशावर चालतात. त्यामुळे इथे काम करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मनात कायम कोरोनाच्या संक्रमाणाची भीती असते. यावर उपाय म्हणून रेल्वेतील तज्ज्ञांनी भंगारमध्ये फेकलेल्या तिकीट आणि पेपर प्रिंटिंग मशीन तसेच पैसे मोजण्याच्या खराब झालेल्या मशिनपासून एक उपकरण तयार केले आहे . यामध्ये अल्ट्राव्हायलेट लाईटची ट्यूब बसवण्यात आली आहे. कागद ज्याप्रकारे प्रिंटिंग मशीनमध्ये टाकला जातो, त्याचप्रमाणे या मशिनमध्ये पैसे आणि अर्जाची प्रत त्यात टाकल्यानंतर बटन दाबताच पैसे आणि आरक्षण अर्जाचे निर्जंतुकीकरण होत आहे..
हेही वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात आज कोरोना आढावा बैठक
अनलॉकला सुरुवात झाल्यापासून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे. मात्र, याच काळात संपूर्ण देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. नागपुरातसुद्धा रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी मध्ये रेल्वेने केलेला प्रयोग फार उपयुक्त ठरणार आहे. कुठलाही खर्च न करता टाकाऊपासून टिकाऊ आणि जनउपयोगी अशा वस्तूची निर्मिती करून मध्ये रेल्वेने आपले कर्तव्यपूर्ण केले आहे. सध्या ही मशीन प्रायोगिक तत्वावर तयार करण्यात आली आहे. आता यापुढे नागपुर मंडळातील प्रत्येक रेल्वे नोंदणी कक्षात अशा प्रकारची मशीन बसवण्याची तयारी केली जात आहे .