नागपूर - नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले जाते. काही पार्ट्यांमध्ये मद्यप्राशन केले जाते. मद्यप्राशन करणाऱ्या जवळ व्यक्तिगत परवाना नसेल तर तो कायदेशीररीत्या गुन्हा ठरतो आणि मद्यपी कारवाईस पात्र ठरतात. नवीन वर्षाच्या आनंदात कारवाईचा बडगा बसायला नको ही जाणीव ठेवून मद्यप्रेमींनी मद्यप्राशनासाठी परवाना घ्यायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत ४७ मद्यप्रेमींनी परवाना घेतला आहे. तसेच ३१ डिसेंबरपर्यंत संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
31 डिसेंबरला दारू पिणाऱ्यांसाठी वेगवेगळी वेळ निश्चित करण्यात आली आहे. बेकायदेशीर पार्टी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षण रावसाहेब कोरे यांनी दिली. दारू कुठून घ्यायची तसेच ती उरलेली दारू कुठे जमा करायची याचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. 1 हजार रुपयांमध्ये वर्षभर मद्यप्राशन करण्याचा परवाना राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे देण्यात येतो.
हेही वाचा - चंद्रपुरातील आदिवासी माना जमातीचा नागदिवाळी उत्सव, 'असा' करतात साजरा