नागपूर - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. तत्पूर्वी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी आपली शक्ती पणाला लावत प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आता या उमेदवारांचे भविष्य मतदारांच्या हातात असून काय होणार, हे निकालाच्या दिवशीच कळणार आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. आज प्रचाराचा अंतिम दिवस असल्याने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, बीएसपी, वंचित बहुजन आघाडी यांसह सर्वच राजकीय पक्षांनी संपूर्ण नागपूर शहरांसह जिल्हा पिंजून काढला. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आज पहिल्या टप्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत.
नागपूर लोकसभा मतदार संघातून एकूण ३० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये १३ उमेदवार अपक्ष निवडणूक लढवत आहे, तर रामटेक लोकसभा मतदारसंघातून १६ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले आहेत. नागपूर शहरात प्रामुख्याने भाजपचे उमेदवार नितीन गडकरी, काँग्रेस पक्षाचे उमेदवार नाना पटोले, वंचित बहुजन आघाडीचे सागर डबरासे, विदर्भ निर्माण महामंचाचे सुरेश माने या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाने आणि काँग्रेस उमेदवार किशोर गजभिये यांच्यात थेट लढत होणार आहे. याशिवाय बहुजन समाज पक्षाचे सुभाष गजभिये आणि वंचित बहुजन आघाडीचे किरण रोडगे पाटणकर यांच्यामध्येदेखील चुरशीची लढत होणार आहे.