नागपूर - रामटेक लोकसभा मतदार संघ शेतकरी आणि मजूर मतदारांचा भाग आहे. शेतकरी सिंचनाअभावी संकटात सापडला आहे. अशातही दीडपट हमीभाव दिला जात नाही. असे असताना याच मतदारसंघातील भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार कृपाल तुमाने जनतेसाठी काय करणार? त्यासाठी त्यांची रणनीती काय असणार? जाणून घेऊया त्यांच्याशी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने केलेल्या चर्चेमध्ये..
राज्य सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी ३५ हजार करोड रुपयांची कर्जमाफी केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जात आहेत. त्यांच्यासाठी जोडधंद्याची व्यवस्था करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करून त्याच पद्धतीने विदर्भात जोडधंदे उभारणार असल्याचे तुमाने म्हणाले.
भ्रष्टाचारी अधिकारी विकास करेल की भकास करेल -
प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केल्यानंतर सत्तेचा मोह कशाला हवा? प्रामाणिक अधिकारी निवृत्तीनंतर शांततेने जीवन जगतात. मात्र, आदिवासी विभागात केलेला असताना एका भ्रष्ट नेत्याला उमेदवारी कशी काय दिली जाते? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. भ्रष्टाचारी अधिकारी विकास करेल की भकास करेल, अशी अप्रत्यक्ष टीका त्यांनी काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभीये यांच्यावर केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभा रामटेक लोकसभा मतदार संघात होणार आहे. तसेच उद्धव ठाकरे ७ एप्रिला, तर आदित्य ठाकरे ४ एप्रिलला सभा घेणार असल्याचे तुमाने यांनी यावेळी सांगितले.