नागपूर - सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरात पोहचलेले 'कराळे मास्तर' आता पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीसाठी त्यांनी बुधवारी नागपुरातील विभागीय आयुक्त कार्यालयात अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
कराळे मास्तर हे मुळचे वर्धा येथील आहेत. लॉकडाऊनपासून ते आपल्या आगळ्या वेगळ्या शिकवणी शैलीमुळे सोशल मीडियात चांगलेच प्रसिद्ध झाले आहे. शिवाय आता ते पदवीधर निवडणूकीच्या रिंगणात उतरल्याने त्यांची चांगलीच चर्चा रंगली आहे. सध्या पदवीधर निवडणूकीची जोरदार धूम सुरू आहे. अनेक उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करतांना दिसून येत आहे. यातील बहूतांश उमेदवारांची काही ना काही राजकीय पार्श्वभूमीवर पहायला मिळत आहे. मात्र, आपल्या आगळ्या वेगळ्या शिकवणी शैलीमुळे प्रसिद्ध झालेले 'कराळे मास्तर' हे सध्या पदवीधर निवडणूकीत उतरले आहेत. बुधवारी त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
कोण आहेत कराळे मास्तर?
मुळचे वर्धा जिल्ह्यातील असलेले नितेश कराळे हे स्पर्धा परिक्षेचे शिकवणी वर्ग घेतात. मात्र, देशासह राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाले आणि शिकवणी वर्गाकरिता ऑनलाइन हा पर्याय समोर आला. याच पर्यायाचा अवलंब करून नितेश कराळे यांनी आपल्या आगळ्या वेगळ्या व अस्सल वऱ्हाडी शिकवणी शैलीमुळे सोशल माध्यमात चांगलेच व्हायरल झाले. 'कराळे मास्तर', 'खद खद मास्तर', अशी त्यांची ओळख निर्माण झाली. त्यामुळे ते चांगलेच प्रसिद्ध झाले. शिवाय आता ते चक्क पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने सध्या त्यांची चांगलीच चर्चा पहायला मिळत आहे. मास्तरांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सोबतच स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आजवर कोणत्याही आमदारांनी काम केले नाही.
हेही वाचा - शिक्षक दिन विशेष: वैदर्भीय बोली भाषेद्वारे प्रसिद्ध झालेल्या 'नितेश कराळेंची' कहाणी
शिवाय स्वतःला स्पर्धा परिक्षेचा अनुभव असल्यामुळे आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांची जाणीव असल्यामुळे आपण मतदारांना न्याय मिळवून देणार, अशी प्रतिक्रियाही कराळे मास्तरांनी दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी मतदार संघातील सहाही जिल्ह्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचणार असल्याची रणनितीही मास्तरांनी बोलून दाखवली.
दरम्यान, एकीकडे या निवडणूकीत अनेक दिग्गज नावे समोर आहेत. मात्र, तरीही कोणताही राजकीय चेहरा नसलेल्या आणि फक्त सोशल माध्यमातून व्हायरल झालेल्या कराळे मास्तरांची सध्या पदवीधर निवडणूकीत चर्चा रंगली आहे. एकंदरीतच नितेश कराळे हे निवडणुकीत उतरल्याने त्यांच्या चाहत्यांकडूनही सोशल माध्यमांवर आनंद व्यक्त केला जात आहे. मात्र, कराळे मास्तरांसाठी ही निवडणूक नक्कीच आव्हानात्मक असल्याचे पाहायला मिळत आहे.