गडचिरोली - अहेरी तालुका मुख्यालयापासून ७० किलोमीटर अंतरावर लोहा, कल्लेड आणि कोंजेड ही गावे आहेत. ही गावे अतिसंवेदनशील आणि आदिवासीबहूल असून स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच या गावांमध्ये जिल्हा परिषद अध्याक्षांनी भेट दिली आहे. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या भेटीनंतर तिन्ही गावांच्या विकासाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
लोहा, कल्लेड आणि कोंजेड या तिन्ही गावांवर माओवाद्यांचे प्रभुत्व आहे. गावात जायला धड रस्ते आणि वीज देखील नाही. त्यामुळे, ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दौऱ्यामुळे गावाचे कायापलट होण्याची आशा बळावली आहे. लोहा, कल्लेड, कोंजेड ही गावे कायम दुर्लक्षित राहिली आहेत. या गावांना आजपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी भेट दिली नव्हती. त्यामुळे, देचलीपेठा येथून दुचाकीवर कच्चा रस्ता आणि नाल्यातून वाट काढत जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार या गावांमध्ये पोहोचले.
गावाला अनेक समस्यांनी विळखा घातला आहे. घनदाट जंगल असलेल्या या भागात रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्य या मुलभूत सुविधांसंदर्भात कंकडालवार यांनी नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या समजून घेतल्या. स्वातंत्र्यानंतर या अतिदुर्गम गावांमध्ये भेट देणारे अजय कंकडालवार हे जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष होते. त्यामुळे, विकासाच्या बाबतीत उपेक्षित असलेल्या या गावात नागरिकांनी आदिवासी नृत्य करीत त्यांचे स्वागत केले.
हेही वाचा- नागपूर-अमरावती महामार्गावर कंटेनर-कारचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू