पुणे - सामान्य नागरिकांप्रमाणेच देशाच्या सीमेवर लढणारे सैनिक देखील गणेशाची भक्ती करतात. यंदा भारतीय लष्करातील १ आणि ६ मराठा बटालियनच्या सैनिकांनी अरुणाचल प्रदेश आणि पंजाबमधील पठाणकोट येथे दगडूशेठच्या श्रींची प्रतिकात्मक मूर्ती स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली आणि ट्रस्टने सैनिकांच्या इच्छेला मान देऊन श्रींची हुबेहुब २ फुटी प्रतिकात्मक मूर्ती देण्याचे मान्य केले. त्यानुसार नुकतीच ही मूर्ती अरुणाचल प्रदेश व पठाणकोटकडे रवाना झाली.
हुबेहुब २ फुटी प्रतिकात्मक मूर्ती पाठवण्यात आली
ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने यांनी सैनिकांना ही मूर्ती सुपूर्द केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती केवळ महाराष्ट्रातच नव्हे. तर सर्वदूर पसरलेली आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोप-यातून भाविक पुण्यात येतात. मात्र, भारतीय सैनिक सीमेवर अहोरात्र पहारा देत असल्याने त्यांना पुण्यामध्ये येताच असे नाही. त्यामुळे १ मराठा बटालियनचे कर्नल जयकुमार मुदलियार आणि ६ मराठा बटालियनचे विनोद पाटील यांनी दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असणाऱ्या मूर्तीची प्रतिष्ठापना सिमेवरील लष्कराच्या पोस्टमध्ये करण्याची इच्छा सैनिकांच्यावतीने व्यक्त केली. ती मूर्ती श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीप्रमाणेच असावी, अशी त्यांची मनोमन भावना होती. त्याप्रमाणे ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्याकडे विनंती करणारे पत्र पाठविले होते.
सैनिकांना वेगळी उर्जा मिळते
कर्नल जयकुमार मुदलियार यांनी पत्रात म्हटले की, पुण्यातून आमची बटालियन टेंगा व्हॅली, अरुणाचल प्रदेश येथे चायनीज बॉर्डर परिसरात जात आहे. मराठा बटालियन दरवर्षी गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरी करते. त्यामुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकात्मक गणेश मूर्तीची स्थापना आम्ही तेथे करु इच्छितो. कर्नल विनोद पाटील यांनी पत्रात म्हटले की, सन २०११ पासून ६ मराठा बटालियन आणि दगडूशेठ गणपती ट्रस्टचे जवळचे संबंध आहेत. पठाणकोट सिमेवर गणेशाची मूर्ती स्थापन केल्याने मराठा बटालियनच्या सैनिकांना वेगळी उर्जा मिळणार आहे. तसेच या ठिकाणी देशामधील सर्व राज्यांतील सैनिक कार्यरत असतात. त्यामुळे बाप्पाचा आशीर्वाद सर्व सैनिकांना मिळेल.