नागपूर - केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे सध्या देशभरात उत्कृष्ट महामार्ग बनवण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्ते बांधणीचे काम करत आहे. मात्र, गडकरींच्या नागपूर लोकसभा मतदारसंघातील रस्ते अर्धवट असल्याने ते अपघाताला कारणीभूत ठरत आहेत.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नागपुरात हजारो वाहन चालकांना रोज मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरात सर्वात जास्त वाहन आणि प्रवासी अमरावती महामार्गातून येतात. त्यामुळे या मार्गावर प्रचंड वाहतूक असते. अमरावतीपासून नागपूरच्या वाडीपर्यंत ४ पदरी महामार्ग उत्कृष्टरित्या तयार झाला आहे. मात्र, वाडी ते महापालिकेच्या हद्दीतील मार्ग खड्डेमय असल्याने या ठिकाणी अपघातांची मालिका सुरू आहे. यामुळे नितीन गडकरी यांच्या ‘रोडकरी’ अशा सकारात्मक प्रतिमेला धक्का बसत आहे.
महापालिकेने मोठा गाजावाजा करून या मार्गाचे दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. मात्र, अर्धवट डांबरीकरण करून कंत्राटदार मोकळा झाल्याने येथे रोज अपघात घडू लागले आहेत. या अपघातामध्ये अनेक जण जखमी झाले असून काही जणांना आपला जीवदेखील गमवावा लागला आहे. त्यामुळे देशभरात उत्कृष्ट रस्ते बांधणाऱ्या केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी या रस्त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे