नागपूर - जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील सावरगाव येथे लग्न समारंभात नवरा-नवरीसह नातेवाईकांची कोविड टेस्ट करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्यामुळे प्रशासनाकडून अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामध्ये लग्नात वधू आणि वर पक्षाकडील अगदी मोजके वऱ्हाडीच लग्नात सहभागी होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून कोविड चाचणी करण्यात आली.
रोशनी लक्षणे आणि रविंद्र धानोरकर यांचा लग्न सोहळा नरखेड तालुक्यातील सावरगाव येथे पार पडला. हा लग्न समारंभ विशेष होता. याचे कारण असे की, लग्न समारंभातील वधू-वरासह त्यांच्या 26 पाहुण्यांचीसुद्धा कोविड टेस्ट मंगल कार्यालयातच करण्यात आली. नरखेड तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विद्यानंद गायकवाड यांच्या नेतृत्वात कोविड चाचणी पार पडली. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता आणि लग्न कार्यातून मोठ्या संख्येत कोरोनाचा फैलाव होत असल्याचे दिसून येत असल्याने अशा चाचण्या करण्यात येत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
कोरोना चाचणीसाठी वधू-वराचा पुढाकार
लग्न समारंभात कोविड टेस्ट करून नागपूर जिल्ह्यातील वधू-वरांनी एकप्रकारे नवीन आदर्श इतरांसाठी निर्माण केला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यासाठी लग्न समारंभात होणारी गर्दी जबाबदार असल्याची चर्चा सुरू असताना आता लग्न समारंभातच आलेल्या पाहुण्यांची कोरोना चाचणी सुरू झाल्याने नेमका संसर्ग कुठून होत आहे, हे शोधण्यासाठी मदत होणार आहे.
हेही वाचा - तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होण्यापूर्वीच ब्रेक; सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचणी